विदर्भात लागले पहिले 'गार रोधक' यंत्र

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


यंत्राला विजेची आवश्यकता नाही

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास मिळणार बळ, खामगाव तालुक्यातील हिवरखडे येथील कास्तकाराचा प्रयोग - नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनात वारंवार घट होत असल्याने खामगाव तालुक्यातील हिवरखेडचे प्रगतीशील कास्तकार दादाराव हटकर (मो.०९९२११२६१०१) यांनी आपल्या शेतात 'गार रोधक' यंत्र (स्केलर वेव्ह जनरेटर) बसविले आहे. गारांचे पावसात रूपांतर झाल्याने या यंत्रामुळे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून या शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान टळले आहे. विदर्भातील शेतीत प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रणेत स्कॅलर लहरी आकाशात सोडल्या जातात. गारपिटीसारख्या आपत्तीच्यावेळी या यंत्राची ढगाच्या दिशेने सेटिंग केल्यास गारा तयार होण्याची प्रक्रिया थांबविता येते. तसेच या यंत्रामुळे संत्र्याच्या आकारातील गारांचे अतिशय लहान गारांमध्ये रूपांतर होते. याशिवाय पावसाच्या वेगावर नियंत्रण मिळविता येणे शक्य होते. या बहुपयोगी यंत्राबाबत माहिती मिळाल्यानंतर दादाराव हटकर यांनी पुणे येथील शास्त्रज्ञांकडून ड्रिझलर (स्कॅलर वेव्ह जनरेटर) यंत्राबाबात बोलणी करून गत महिन्यातच हे यंत्र आपल्या हिवरखेड शिवारातील शेतात बसविले. या यंत्रामुळे मार्च २०१५ महिन्याच्या सुरूवातीला आलेल्या गारपिटीवर नियंत्रण मिळविल्याचा अनुभव आपण घेतला असल्याचे दादाराव हटकर यांचे बंधू रमेश हटकर यांनी सांगितले. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्राचे सर्व प्रथम प्रात्यक्षिक सन २०१० साली पुण्यातील कोथरूड येथे घेण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये नगर, सोलापूर, सातारा परिसरात सहा ते सात यंत्र बसविण्यात आले. महिनाभरापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथे हे यंत्र बसविले आहे.

डॉ. दत्तात्रय जाधव (मोबा.९८५०८०९७०७)

शास्त्रज्ञ तथा संशोधक: स्कॅलर वेव्ह जनरेटर, पुणे या यंत्राला विजेचा आवश्यकता नाही. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रात तांबे, अॅल्युमिनियम, लोखंड यासारख्या घातुंचा वापर केला आहे. हे यंत्र धातू विश्वातील स्कॅलर एनर्जी शोषून घेतात. यंत्राची वायर जमिनीला जोडली असता यंत्र सुरू होते. वजन ५० किलोपर्यंत असल्यामुळे हे यंत्र हलविण्यास सोपे आहे. लहरी निघणाऱ्या सर्व दिशेने पाईप फिरविता येत असल्याने हातळण्यास हे यंत्र अतिशय सुलभ आहे.