शेवंती - उत्पादन तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेवंती हे व्यापारीदृष्ट्या एक महत्त्वाचे फुलझाड आहे. अमेरिका आणि जपानसारख्या अनेक देशांमध्ये शेवंतीची गणना पहिल्या नंबरवर केली जाते. बऱ्याच देशांमध्ये गुलाबानंतर शेवंतीचा नंबर उत्पादित मालाच्या किंमतीनुसार लागतो. शेवंतीचे फूल जपानचे राष्ट्रीय फूल आहे. नियंत्रित वातावरण, विविध प्रकारच्या खतांचा तसेच संजीवकांचा वापर पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत करून शेवंतीचे पीक वर्षभरामध्ये कधीही घेता येईल.

भारतामध्ये शेवंतीची लागवड बऱ्याच ठिकाणी करतात. उत्तर भारतामध्ये शेवंतीची लाल आणि निळ्या जातींची, दक्षिणेत आणि पूर्व भारतामध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या जातींची लागवड करतात. महाराष्ट्रामध्ये अहमनगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि नागपूर या ठिकाणी शेवंतीची नैसर्गिक पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या जातींची लागवड करतात. राज्यात ७०० ते ८०० हे. क्षेत्रावर शेवंतीची लागवड आहे.

महाराष्ट्रामध्ये साधारणत: एप्रिल - मे मध्ये शेवंतीची लागवड करतात आणि ऑक्टोबर - फेब्रुवारी मध्ये फुले मिळतात. कारण शेवंतीला फुले येण्यासाठी अंधाराचा कालावधी आणि तापमान फार महत्त्वाचे असते. फुले येण्यासाठी सुरुवातीला ९ ते ९।। तासांचा अंधाराचा कालावधी लागतो. नंतर हा अंधाराचा कालावधी १२ ते १४ तास वाढवावा लागतो. हा कालावधी महाराष्ट्रामध्ये फक्त हिवाळ्यामध्येच असतो. त्यामुळे कोणत्याही महिन्यात लागवड केली तरी फुले मात्र ऑक्टोबर - फेब्रुवारी मध्येच मिळतात. म्हणून या फुलझाडांची बाहेरील वातावरणामध्ये ठराविक हंगामाव्यतिरिक्त लागवड करू शकत नाही. परंतु वातावरणातील घटकांचे हरितगृहात व्यवस्थित नियंत्रण करून आपल्याला हरितगृहामध्ये वर्षभर शेवंतीची लागवड करता येते आणि वर्षभर फुलांचे उत्पन्न घेणे शक्य आहे.

हरितगृहामध्ये शेवंतीची लागवड केल्यास उत्पन्नावर कसा परिणाम होतो हे पुढील तक्त्यावरून दिसून येईल

शेवंतीची जात   उत्पादन (टन/हे.)   उत्पादनात झालेली वाढ टक्के  
हरितगृह   बाहेरील   हरितगृह   बाहेरील  
बग्गी   १३.०४   १०.९३   १९.३   --  
झिप्री (लोकल)   ९.१३   ७.०४   २९.७   --  
सोनालीतारा   २०.०८   १२.८७   ५६.००   --  
कुंदन   १०.२५   ६.२९   ६२.९५   --  


हरितगृहातील लागवडीमध्ये सोनलीतारा व कुंदन या जातींचे उत्पादन बाहेरील लागावीपेक्षा अनुक्रमे ५६ ते ६३% जास्त आलेले आहे. यावरून असे दिसून येते की हरितगृहामध्ये शेवंतीची लागवड केल्यास उत्पादनामध्ये वाढ होऊन फुलांची प्रत आणि साठवण क्षमतासुद्धा अनेक पटींनी चांगली आढळून आली.

शेवंतीची अभिवृद्धी छाट कलमाने (Stem tip Cutting) केली जाते. मुळ्या फुटलेले छाट (कटिंग) यांची लागवड करून रोपांची लांबी (वाढ) आवश्यकतेप्रमाणे होईपर्यंत प्रकाशाचा कालावधी जास्त असलेल्या दिवसात (Long Day's) लावली जातात आणि त्यानंतर प्रकाशाचा कालावधी कमी असलेल्या दिवसात (short day's) शेवंतीला फुले येईपर्यंत रोपे वाढविली जातात. फुलांची काढणी केल्यानंतर रोपे उपटून मातीची व जमिनीची पुन्हा मशागत करतात आणि लगेच मुळ्या फुटलेला छाट (कटिंग) पुढच्या पिकासाठी पुन्हा लावले जातात. पिकाची हाताळणी करण्याच्या पद्धतीवर अंदाजे तीन पिके एका वर्षात एकाच क्षेत्रावर घेता येतात.

* रोपवाटिका : शेवंतीमध्ये मुळ्या फुटण्याची क्रिया शक्यतो सहज होते. त्यासाठी चांगल्या प्रतीचे माध्यम वापरल्यास अजूनही चांगल्या आणि लवकर मुळ्या फुटतात. शेवंतीच्या छाटांची रोपवाटिकेत लागवड करताना दोन छाटांमध्ये २ सें.मी. तर दोन ओळीत ५ सें.मी. अंतर ठेवावे. छाट लावताना ते जमिनीत सरळ उभे राहू शकतील इतपतच जमिनीत दाबावेत. सर्वसाधारणपणे ४ ते ६ सें.मी. लांबीचे आणि ३.३ ते ४.७ मि.मी. तळाची जाडी असलेले छाट लागवडीसाठी उत्तम समजावेत. हरितगृहातील अशा प्रकारच्या छाटांना चांगल्या आणि लवकर मुळ्या फुटव्यासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरणीय घटकांचे दोन प्रकार पडतात.

१) सबस्ट्रेट वातावरण आणि

२) हवेतील वातावरण

सबस्ट्रेट वातावरण म्हणजे थोडक्यात जमिनीतील किंवा माध्यमातील वातावरण छाटांच्या लागवडीनंतर जमिनीतील तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस असल्यास मुळ्या चांगल्या फुटतात. परंतु हेच तापमान १६ अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाले तर मुळ्या फुटण्याचे प्रमाण फारच कमी होते. अशा प्रकारच्या तापमानाबरोबर सबस्ट्रेट वातावरण, माध्यमाचे भौतिक तसेच रासायनिक गुणधर्म, ओलावा आणि किडींचे अस्तित्व यावरसुद्धा परिणाम होतो. वातावरणीय घटकांच्या दुसऱ्या प्रकारात म्हणजेच हवेतील वातावरण प्रकाश, आर्दता आणि हवेचे संघटन या बाबींचा समावेश होतो. छाटांना चांगल्या मुळ्या फुटण्यासाठी हवेतील तापमान १२ अंश सेल्सिअस, प्रकाशाची तीव्रता ३२०० लक्स प्रति चौरस मीटर तसेच कर्बवायूचे प्रमाण १०,००० ते १२,००० भाग प्रति लक्षांक्ष (PPM) १२ तास प्रति दिन इतके नियंत्रित करणे आवश्यक आहे.

शेवंतीच्या छाटांना चांगल्या मुळ्या येण्यास सर्वसाधारणपणे दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. मुळ्यांची लांबी १ सें.मी. झाल्यावर तयार रोपे उचलणे आवश्यक आहे. शेवंतीच्या मुळ्या फुटलेले किंवा न फुटलेले छाट १ अंश सेल्सि. तापमानास काही आठवड्यापर्यंत टिकू शकतात.

* जाती : शेवंती हे बहुवर्षीय फुलझाड आहे. जगामध्ये शेवंतीच्या साधारणत: १५००० जाती आढळतात. महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यात शेवंतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या ठिकाणी राजा, झिपरी, पांढरी रेवडी, पिवळी रेवडी इ. जातींची लागवड केली जाते. शेवंतीच्या इतर जातींमध्ये बग्गी, सोनाली तारा, इंदिरा, राजा, जया, मोहिनी डायमंड ज्युलिबी, स्नोबॉल, राखी, ज्युली, इ. जाती आहेत.

शेवंतीच्या वेगवेगळ्या रंगानुसार जाती -

क्र.   रंग   जाती  
१   पांढरा   बग्गी, पांढरी रेवडी, स्नो बॉस, ब्युटी, बिरबिल सहानी  
२   पिवळा   झिपरी, कुंदन, इंदिरा, सोनलीतारा, सुपरजयंट, चंद्रमा  
३   लाल   जया, राखी, जुली, रेडगोल्ड, गार्नेट  
४   जांभळा   शरदप्रभा, निलिमा, पिकॉक, महात्मा गांधी  


* जमिन: शेवंती लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत यशस्वी होऊ शकते. तरीसुद्धा जमीन सुपीक, निचऱ्याची आणि पाणी धारण करण्याची चांगली क्षमता असणारी असावी. हरिगृहातील जमीन चांगली उभी आडवी नांगरून टिलरचे सहाय्याने ढेकळे फोडून सपाट करून घ्यावी. जमीन सपाट करतानाच चांगले कुजलेले शेणखत अंदाजे १.५ ते २ टन टाकून जमिनीत मिसळून घ्यावे. वाफे तयार करण्यापुर्वी जमिनीचे माध्यामाचे निर्जुतुकीकरण करणे आवश्यक आहे. निर्जंतुकीकरण खालीलपैकी कुठल्याही पद्धतीने करावे.

१) क्लोरोपिक्रीन : ८ ते १० मिली प्रति घनफूट क्षेत्रास पाण्यातून टाकावे. तसेच वाफे/माध्यम काळे प्लॅस्टिक पेपरने झाकावे. नंतर ४८ तासांनी प्लॅस्टिक काढून टाकावे आणि पाण्याचा निचरा करून घ्यावा. * फॉरमॅलीन: २० ते ३० मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून ओल्या वाफ्यावर टाकावे. वाफे ३५ तास काळे प्लॅस्टिक पेपरने झाकावे. नंतर प्लॅस्टिक पेपर काढून पुन्हा पाण्याचा निचरा करून घ्यावा आणि रासायनिक अवशेष राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

३) बासामिड : ४० ग्रॅम/घनफूट वाफ्यात मिसळून वाफे ४८ तास प्लॅस्टिकने झाकून इतर क्रिया वरीलप्रमाणे करावी.

* वाफे तयार करणे : हरितगृहामध्ये शेवंतीची लागवड गादी वाफ्यांवर करणे फायद्याचे असते. वाफ्याची उंची ४० सें.मी. रुंदी ५० सें.मी. ठेवून सोयीप्रमाणे लांबी ठेवावी. दोन गादी वाफ्यांमध्ये ४० सें.मी. अंतर ठेवावे.

* लागवड : शेवंतीची लागवड करण्यापुर्वी जमीन खोलवर नांगरून घ्यावी. कुळवून जमीन भुसभूशीत करून घ्यावी. प्रतिहेक्टरी ४० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे. शेवंतीची लागवड महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यापासून ते अक्षयतृतीयेपर्यंत केली जाते. या कालावधीमध्ये लागवड कलेल्या रोपांना दसरा - दिवाळीपर्यंत फुले येतात. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये शेवंतीची लागवड केली जाते. या रोपांचे उत्पादन नाताळ व लग्नसराईमध्ये मिळू शकते. शेवंतीची लागवड सरी वरंब्यामध्ये ३० x २० सें.मी. अंतरावर वरंब्याच्या पोटाशी केली जाते. लागवडीसाठी निरोगी सकर्सनिवडून लावले जातात. रोपांची लागवड दुपारनंतर करणे जास्त फायदेशीर ठरते. प्रतिहेक्टरी १,४०,००० रोपे लागवड केली जातात.

शेवंतीची लागवड, फुले येण्याचा कालावधी व जातीबाबतची माहिती पुढीलप्रमाणे

क्र.   लागवडीची वेळ   फुले येण्याचा कालावधी   जाती  
१   जानेवारी   एप्रिल, मे   ज्वाला ज्योती  
२   फेब्रुवारी   जून, जुलै   वर्षा, मेघदूत  
३   मार्च   सप्टेंबर, ऑक्टोबर   शोभा, शरद  
४   जुलै   ऑक्टोबर, नोव्हेंबर   शरदक्रांती, शरदमाला  
५   ऑगस्ट   डिसेंबर, जानेवारी   जया, वासंतिका  
६   ऑगस्ट   फेब्रुवारी, मार्च   इलिनी, कॅसकेट  


* पुनर्लागण आणि थेट लागण : शेवंतीची लागवड दोन प्रकारे करता येते. रोपवाटिकेतून रोपे तयार करून किंवा थेट छाट योग्य अंतरावर लावून. भारतात बहुतेक ठिकाणी थेट छाट लावून लागवड केली जाते. छाटांची निवड सांगितल्याप्रमाणे करावी आणि योग्य त्या अंतरावर उथळ लागवड करावी. लागवड केल्यानंतर महत्त्वाच्या तीन बांबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे छाटातील पाण्याने प्रमाण बाष्पीभवनाद्वारे कमी होऊ न देणे. दुसरी म्हणजे मुळांची वाढ लवकर आणि जोमदार होण्यास मदत करणे आणि तिसरी बाब म्हणजे फुटलेल्या रोपांना नत्राची उपलब्धता करून देणे. हरितगृहात मिस्टरचा वापर करून किंवा कडक उन्हाळ्यात छतावरील आवरणामुळे सावली करून बाष्पीभवनाद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करता येते. मातीमध्ये किंवा माध्यमामध्ये आवश्यक तितक्या हवेचा पुरवठाकरून मुळांच्या वाढीला चालना देता येते. त्यासाठी छाटांची लागवड उथळ करणे आवश्यक आहे व वाढीचे काळात गरज भासल्यास नत्राचा पुरवठा थोड्या प्रमाणात पाण्याद्वारे करावा.

* आधार देणे : शेवंती झाडांना आधार देण्याचा मुख्य हेतू म्हणजे झाडे पर्यायाने फुलदांडे सरळ उंच वाढावेत. आधारासाठी वेल्डेड फॅब्रिक वायर पद्धतीच्या वापर करणे सोयीस्कर ठरते. लागवडीचे वेळी जमिनीच्या पातळीवर फॅब्रिक वायर ठराविक अंतरावर ठेवली जाते आणि त्यानुसार लागवड केली जाते. जसजशी रोपांची वाढ होते तसतशी वायरची उंची वाढविली जाते. त्यामुळे रोपांच्या वरच्या भागाची वाढ सरळ उंच होते. अशाप्रकारे फॅब्रिक वायरचा वापर करताना ती जास्तीत जास्त ताण देवून ओढून बांधली जाते. प्रत्येक तीन मीटर अंतरावर उभे क्रॉसबार लावून वायरला आधार दिला जातो. आधार देण्याचा मुख्य फायदा म्हणजे प्रति चौरस क्षेत्रावर जास्तीत जास्त रोपांची वाढ व्यवस्थित होते.

* तापमान : हरितगृहात पंखे आणि पॅडसचा वापर करून गारवा निर्माण करता येतो आणि पिकांच्या वाढीस सुधारणा करता येते. बिगर हंगामी चांगल्या प्रतीचे फुलोत्पादन करणेसाठी फुलकळ्या येतेवेळी तापमान मध्यम असणे फार महत्त्वाचे आहे. ज्यावेळी कमी कालावधीचा दिवस सुरू होतो तेव्हा काही जातींसाठी रात्रीचे तापमान १६ डी. ते १८ डी. सें.ग्रे. इतके असावे. शेवंतीची सर्वदृष्टीने समाधानकारक वाढ होण्यासाठी दिवस आणि रात्रीचे तापमान अनुक्रमे २२ अंश आणि १६ अंश से.ग्रे. इतके असावे. फुलकळ्या दिसू लागताच रात्रीचे तापमान १८ अंश सें. पासून १६ अंश सें. ग्रे. इतके कमी करावे. १२ ते १५ आठवडे प्रकाश संवेदनाक्षम प्रकारातील अनेक जातींच्या फुलकळ्यांची वाढ रात्रीच्या १३ अंश ते १५ अंश सें.ग्रे. तापमानातील चांगली होते. तर १६ अंश सें.ग्रे. किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात फुलकळ्यांची वाढ मंदावते.

* शेंडा खुडणे, छाटणी आणि कळ्या खुडणे : शेवंतीची लागवड दोन पद्धतीच्या उद्दिष्टानुसार केली जाते. एक म्हणजे सिंगल स्टेम म्हणजेच एका दांड्यावर एक फूल आणि दुसरी म्हणजे मल्टिस्टेम म्हणजेच एका दांड्यावर दोन किंवा अधिक फुले घेणे. यातील दुसऱ्या प्रकारातील शेंडा खुडणी करणे आवश्यक आहे. लागवडीचे अंतर पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारासाठी अनुक्रमे १० x १५ सें.मी. आणि १५ x २० सें.मी. इतके असते. परंतु पद्धत कुठलीही असो झाडांमधील लागवडीचे अंतर सर्वसाधारणपणे समानसुद्धा ठेवता येते. मात्र त्यासाठी शेंडा खुडण्याबरोबर छाटणीचीसुद्धा आवश्यकता असते. अशा पद्धतीने लागवडीचे अंतर २० x २३ सें.मी. इतके राखावे लागते. लागवडीनंतर शेंड्याकडील वाढ पुरेशी होण्यासाठी काही कालावधी जावू द्यावा लागतो. जेणेकरून नवीन येणाऱ्या फुटव्यांचा शेंडा खुडणे सोयीचे जाते. शेंडा खुडताना कमीत कमी खुडावा. शेंडा खुडणीनंतर अल्पावधीतच अनेक नवीन फुटवे येतात. जागेच्या उपलब्धतेनुसार आवश्यक तेवढेच फुटवे ठेवावेत. सुरुवातीच्या २ ते ३ फुटव्यांनाच उच्च प्रतीची फुले येतात. यासाठी लागवड करतानाच रोपामध्ये पुरेसे अंतर ठेवावे, जेणेकरून २ - ३ दांड्यांना वाढीसाठी जागा पुरेल. तसेच वाढीनुसार सुरूवातीच्या काही फुटव्याची छाटणीसुद्धा करावी लागते. दांडे/फुटवे हाताळणी करण्याइतपत झाल्यावरच छाटणी करावी.

शेवंतीच्या दांड्यावरील किंवा फुटव्यावरील अनाश्यक कळ्या काढून टाकण्याच्या क्रियेला 'डिसबडींग' म्हणतात. स्टेंडर्डसारख्या फुलाच्या प्रकारात एका दांड्यावरच एक मोठे आकर्षक फूल येणे अपेक्षित असते किंवा ठेवावे लागते. त्यासाठी त्या दांड्यावर बाजूने येणाऱ्या फुलकळ्या काढून टाकाव्या लागतात. अशा प्रकारच्या फुलकळ्या हाताळणी करण्याइतपत झाल्याबरोबर लगेच काढून टाकाव्यात. अन्यथा दांड्यावरील फुलाचा अपेक्षित आकार कमी होतो आणि फुलांची वाढ मंदावते.

* खते : योग्य वेळेला योग्य प्रकारात खतांची मात्रा दिली तरच शेवंतीचे अपेक्षित उत्पादन मिळते. सर्व खतांच्या मात्रा फुले येण्यापूर्वीच द्याव्यात. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची आवश्यकता वाढीच्या सुरूवातीच्या काळात जास्त असते.

नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज पडल्यास फवारणीद्वारे द्यावे. सर्वसाधारण एकरी १०० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत लागवडीच्यावेळी देवून नंतर १ ते १।। महिन्यांनी पुन्हा १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. त्याने जमिनीची सुपिकता वाढून झाडांची जोमाने वाढ होते. फुटवा वाढून फुलकळ्या वाढतात. फुलांचा दर्जा, आकार वाढतो, शेवंतीची लागवड करणे अगोदर माध्यमाचे / मातीचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

* पाणी : शेवंतीच्या सुरूवातीच्या वाढीच्या काळात खतांबरोबर पाण्याची आवश्यकता असते. फुलकळ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर पानांची वाढ मंदावते आणि पाण्याची गरजसुद्धा कमी होते.

पाण्याची जास्तीत जास्त बचत आणि परिणामकारक वापर करणेसाठी ठिबकसंच वापरणे अपरिहार्य आहे. पाणी आणि खते एकाचवेळी देण्यासाठी ठिबकचा वापर करता येतो. पिकाचे सुरूवातीचे काळात सुक्ष्म फवारे आणि त्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे खते व पाणी दिल्यास उत्तम प्रकारचे उत्पादन घेता येते. सूक्ष्म तुषार पद्धतीमुळे सुरूवातीचे काळात योग्य आर्द्रता ठेवणे शक्य होते. हरिगृहांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करून घ्यावी. पाण्याचा सामु ६.५ ते ७ किंवा जवळपास असावा. पाण्यात कार्बोनेट क्लोराईड इ. असल्यास काही अन्न घटकांची उपलब्धता होत नाही. पाण्याचा सामू जास्त असल्यास त्यात आम्ल मिसळून तो कमी करता येतो.

* शेवंतीवरील महत्त्वाच्या किडी व यांचे नियंत्रण :

किडी - १) मावा : ही कीड शेवंतीच्या शेंड्यावर, पानावर आणि कळ्यांवर मोठ्या प्रमाणात आढळते. या किडींचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे पावसाळा आणि त्यानंतरच्या थोड्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर होतो. ही कीड कोवळी पाने, कळ्या आणि खोडामधील अन्नरस शोषण करते. यामुळे एकूण उत्पादनात व फुलाच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतो.

या किडीच्या नियंत्रणासाठी स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी या किटकनाशकाची १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

२) फुलकीडे : या किडीचा उपद्रव हा ऑक्टोबरच्या कडक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर शेवंतीच्या कळ्या व फुलांवर आढळतो. त्यामुळे कळ्या व फुलांचे नुकसान होऊन त्याची गुणवत्ता व उत्पादन कमी होते, या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे कळ्या लागल्यापासून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

३) लाल कोळी : या किडीचा उपद्रव उन्हाळ्यात शेवंतीच्या पानांच्या खालच्या बाजूस आढळतो. ही कीड पानांच्या खालच्या बाजूस जाळ्या तयार करतात व त्यामुळे पाने गुंडाळली जाऊन झाडाची वाढ मंदावते.

या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी या प्रमाणात फवारले असता या किडीपासून पिकाचे संरक्षण होते.

४) अस्वली अळी : या किडीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचप्रमाणे कळ्या लागण्याच्या सुमारास कळ्यांवर देखील याचा उपद्रव होतो. पावसाळ्यात या अळ्यांनी वाढ झपाट्याने होते. त्या संपूर्ण पाने खातात व फक्त झाडाचा सांगाडा राहतो. त्याचप्रमाणे कळ्या लागण्याच्या सुमारास कळ्या देखील खातात.

सुरुवातीस अळ्यांचा उपद्रव कमी असताना अळ्या गोल करून माराव्यात. जास्त प्रमाणात उपद्रव आढळल्यास स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारावे किंवा कार्बारिल या कीटकनाशकाच्या द्रावणाची ०.२ % फवारणी करावी.

शेवंतीवरील रोग : शेवंती या फूल पिकावर अनेक बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असून काही रोगांमुळे या फुलझाडाचे अतोनात नुकसान होते.

१) बुरशीजन्य रोग : मूळ कूज : हा रोग पिथियम फायटोप्थोरा आणी फोमा या बुरशीमुळे खालच्या पानांवर प्रथमत: लक्षणे दिसतात. ही पाने पिवळी पडून सुकण्याची अवस्था दर्शवितात. रोगाची लक्षणे वरच्या पानांवर पसरतात आणि त्यावर करपलेले ठिपके तयार होतात. कलांतराने रोगट झाडे सुकतात.

नियंत्रणासाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी, वाफ्यांवर पाणी साचू देऊ नये. रोग दिसू लागताच थायरम (०.३%) अथवा कॅप्टान (०.३%) यांचे द्रावण जमिनीत ७ ते १० दिवसांचे अंतराने ४ ते ५ वेळा टाकावे किंवा एकरी जर्मिनेटर १ लि. + हार्मोनी ५०० मिलीचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करावे.

* खोड कूज :हा रोग रायझोक्टोनिया सोलॅनी या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे जमिनीलगतच्या खोडावर लागण होऊन तो भाग तांबडा होतो आणि खोड कुजते. पानांवर अनियमित आकाराचे ठिपके दिसतात आणि पानांची कूज आढळून येते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम (०.२५%) यांचे द्रावण जमिनीत टाकावे. हार्मोनी २० ते २५ मिली/१० लि. पाणी याप्रमाणे १० ते १५ दिवसांचे अंतराने ३ ते ४ फवारण्या घ्याव्यात.

* कोड कूज आणि मर: हा रोग फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरिम या बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण रोपवाटिकेत काड्यांना मुळे फुटताना झाली असली तरी रोगाची लक्षणे फुलकळ्या उमलू लागल्यानंतर निदर्शनास येतात. जमिनीलगतचे खोड गडद तांबडे होऊन कुजते. झाडांची खालची पाने पिवळी पडतात. रोगट झाडे संपूर्ण पिवळी पडून मरतात.

या रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २० मिली/१० लि. पाणी हे बुरशीनाशक रोपवाटिकेत शेवंती रोपावस्थेत असताना ७ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा टाकावे.

* करडी काजळी : हा रोग बोट्रायटीस सिनेरा या बुरशीमुळे होते. या रोगाची खोडाला लागण झाल्यास खोडाचा भाग कुजतो आणि खोडाचा वरचा भाग सुकतो. रोगाची लागण कडांकडून होऊन मध्ये शिरेकडे पसरत जाते आणि काही वेळ रोगट भागाचे अर्धवर्तुळाकार पट्टे निदर्शनास येतात. फुलांतील लागणीमुळे खालच्या पाकळ्यांवर तांबडे पानथळयुक्त ठिपके पडतात आणि कालांतराने हे ठिपके वरच्या पाकळ्यांवर पसरतात, रोगट फुले कुजतात.

या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसू लागताच हार्मोनी २० मिली + १० लि. पाणी याप्रमाणे अथवा कॅप्टान (१.०%) अथवा टॉंपसिन एम. (०.०५%) किंवा थायरम (०.२%) बुरशीनाशकांच्या १० दिवसांचे अंतराने ३ - ४ फवारण्या कराव्यात.

* पानांवरील ठिपके : हा रोग सेप्टोरिया या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानांवर तांबडे ठिपके पडतात. आर्द्रतायुक्त हवामानात या ठिपक्यांची संख्या आणी आकारमान झपाट्याने वाढते. पाने पिवळी पडतात आणि सुकतात. झाडांची वाढ खुंटते आणी फुलांच्या उत्पादनात लक्षणीय घट येते.

नियंत्रणासाठी हरितगृहात हवा कोरडी राहील याकडे लक्ष द्यावे. हार्मोनी २० मिली/१० लि. पाणी या बुरशीनाशकाच्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ फवारण्या द्याव्यात.

* भुरी : हा रोग ओईडियम क्रिसेयथमी या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाच्या पावडरीचे पट्टे आढळून येतात. रोगट पाने पिवळी पडतात आणि उत्पादनात घट आढळते.

नियंत्रणासाठी रोग दिसू लागताच हार्मोनी २० मिली/१० लि. पाणी या बुरशीनाशकाच्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ फवारण्या कराव्यात.

२) जिवाणूजन्य रोग :

जिवाणू करपा : हा रोग इर्विनिया क्रिसेंथेमी या जीवाणूमुळे होतो. पानांवर, फांद्यांवर आणि खोडांवर तांबड्या रेषा तयार होतात. दिवसा रोगट झाडाच्या एक किंवा अनेक फांद्या कोमजतात आणि रात्री पूर्वावस्थेत होतात. खोडाचा शेंडा तांबडा पडून लवचिक होतो आणि कोलमडून पडतो. खोड पोकळ होऊन तांबड्या रेषा शेंड्याकडून खालपर्यंत निदर्शनास येतात.

नियंत्रणासाठी रोगमुक्त कांड्या लागवडीसाठी वापराव्यात. स्ट्रेप्टोमायसीन या प्रतिजैवकांच्या ०.०२५% तीव्रतेच्या ३ ते ४ फवारण्या १५ दिवाचे अंतराने द्याव्यात किंवा थ्राईवर ३० मिली + क्रॉपशाईनर ३० मिली + हार्मोनी २० मिली + १० लि. पाणी याप्रमाणे ३ - ४ फवारण्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

३) विषाणूजन्य रोग :खुजवा : या रोगामुळे पाने पिवळी पडतात. पानांच्या कडा पर्णपणे वाढत नाहीत. टणक होतात. फुलांची पूर्ण वाढ होण्यापुर्वीच फुले उमलतात. झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते. नियंत्रणासाठी विषाणूविरहीत कांड्या लागवडीसाठी वापराव्यात. रोगट झाडे दिसताच त्यांचा उपटून नायनाट करावा.

* केवडा : या रोगामुळे पानांच्या शिरा पारदर्शक होतात. पानांवर पिवळसर - हिरवे भाग तयार होतात. पानांचा आकार लहान होतो. झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट होते.

नियंत्रणासाठी विषाणूविरहीत कांड्यापासून रोपे तयार करावीत. रोगट झाडे दिसताच उपटून त्याचा नाश करावा. आंतरप्रवाही किटकनाशकांचा (उदा. न्युवाक्रॉन ०.०५%, अथवा रोगाट ०.१%) वापर करावा. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असणाऱ्या माव्याचे नियंत्रण करावे.

वरील कीड - रोगांच्या नियंत्रणासाठी तसेच झाडांची जोमदार वाढ होवून फुलांचे उत्पादन व दर्जा वाढण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) :जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली. + २०० लि.पाणी.

काढणी : जाती परत्वे लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यात फुलांची तोडणी सुरू होते आणि पुढे महिनाभर चालते. लागवड ही फुलांसाठी अथवा फुलांच्या दांड्यासाठी केली आहे त्यावर काढणी अवलंबून असते. ५०० चौ.मी. आकारमानाच्या हरितगृहातून १.५ ते २ टन (२० ते २३ हजार) फुलांचे उत्पादन मिळते.

पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी. उमललेली फुले उशिरा काढल्यास फुलांचा रंग फिका पडतो.

ग्राहकांच्या हातात चांगल्या प्रतीची फुले पडण्यासाठी फुलांच्या बाजूचा रंग हिरवट असतानाच त्याची काढणी करावी. स्प्रे प्रकारच्या फुलांची काढणी करताना केंद्र स्थानावरील फूल उमललेले असले पाहिजे. तसेच बाजूची फुले चांगली वाढलेली पाहिजेत. स्टँडर्ड फुलांच्या बाबतीत मात्र केंद्र स्थानाचे फूल पूर्णपणे उमलल्या नंतर काढणी करावी. फूल दांडे कापते वेळी कापण्याचे ठिकाण पुरेसे मऊ असले पाहिजे. कारण फारच कठीण दांडे पाणी शोषून घेत नाहीत. दांड्यांच्या खालच्या बाजूची १/३ लांबी वरील पाने काढून टाकावीत आणि दांडे पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत. नंतर काही तासांनी फुलांची प्रतवारी करून गड्डे बांधावेत आणि पॅकिंग करावे.

* साठवण : शेवंतीची फुले थंड वातावरणात पाण्यात बुडवून चांगली रहात असली तरी त्याचे आयुष्य १ अंश से. तापमानात ठेवल्यास परिणामकारक वाढू शकते. यासाठी फुले किंवा फुलांचे गुड्डे मेणाचा थर असलेल्या किंवा प्लॅस्टिक लाइनिंगच्या बॉक्समध्ये ठेवावेत आणि असे बॉक्स आवश्यक त्या तापमानात (१ अंश से.) ठेवावेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य तीन आठवड्यापर्यंत सहज वाढू शकते. पेशीमधील कोरडेपणा आणि थंड तापमान यामुळे श्वासोच्छश्वासाची क्रिया मंदावते. शीतगृहातून फुले बाहेर काढल्याबरोबर दांड्याचा खालचा भाग कापून ते ३३ अंश से. तापमानाच्या पाण्यात बराच कालपर्यंत बुडवून ठेवावेत आणी नंतर १० अंश से. तापमानात ठेवून नंतरच बाजार पेठेसाठी पॅकिंग करावे. साठवण किंवा पॅकिंग करताना रोगट फुले, दांडे यांचे अंतर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रतवारीनुसार फुलाचे पॅकिंग ९१ x ४३ x १५ सें.मी. आकाराच्या कोरूगेटेड बॉक्समध्ये करतात.

बॉक्समध्ये ज्या बाजूला फुले असतात तेथे फुलाखाली मऊ पॅडस ठेवून नंतरच पॅकिंग करतात. दांडे मात्र शेवटी टोकास एकत्र बांधतात. पॅकिंग करण्याचे अगोदर शीतकरण करणे आवश्यक आहे.

* नियोजन : निसर्गत:च शेवंतीची लागवड जूनमध्ये उशिरा सुरू करून ऑगस्टच्या मध्यापर्यंत दर आठवड्याला फुलांची काढणी करता येते आणि त्याप्रमाणे फुलांची उपलब्धता ऑक्टोबर अखेर ते डिसेंबर अखेरपर्यंत चालू राहते. वरीलप्रमाणे नेहमीच्या हंगामासह वर्षभर प्रत्येक आठवड्याला चांगल्या प्रतीच्या फुलांच्या भरपूर उत्पादनासाठी हरितगृहांमध्ये शेवंतीची लागवड केली जाते. हरितगृहामधील उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून योग्य वेळेला भरपूर फुलांचे उत्पादन मिळविण्यासाठी पिकाचे वर्षभराचे वेळापत्रक लागवडीपुर्वी एक - दोन वर्षे अगोदरच ठरविणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रत्येक लागवडीचे युनिट, फुलोऱ्याची तारीख, पुनर्लागवडीची तारीख, दुसऱ्या फुलोऱ्याची तारीख इत्यादींचा समावेश होतो. एका युनिटच्या फुलोऱ्याची तारीख आणि पुन्हा लागवडीची तारीख यामध्ये सर्वसाधारण एक आठवड्याचे अंतर असावे. या एक आठवड्याच्या कालावधीत पहिल्या पिकाच्या फुलांची काढणी करणे, जमिनीची मशागत करणे, माध्यमाला वाफ देणे आणि लागवडीची इतर तयार करून घेता येते.