चार सुत्रीचे जनक

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


डॉ. एन. के. सावंत ज्येष्ठ रसायन शास्त्रज्ञ यांनी भाताच्या चार सुत्रीचा भारतामध्ये शोध लावून प्रभावीपणे त्याचा वापर करून भात शेतीमध्ये अधिक दर्जेदार उत्पादन घेण्याचे कोकण, चंद्रपूर, भंडारा अशा महाराष्ट्राच्या विविध भागात प्रयोग यशस्वी केले. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या स्मृतीप्रत्यार्थ 'कृषीरत्न डॉ. नारायण सांवत चार सुत्री भात शेतीचे जनक' असा त्यांचे विद्यार्थी सहकारी, मित्र, आप्तेष्ठ, स्नेही, वरिष्ठ अशा २१२ जणांनी आपल्या आठवणींचा संग्रह २५० हून अधिक पृष्ठांमध्ये मांडलेला आहे. त्याचे प्रकाशन मा. विकास देशमुख, कृषी आयुक्त महारष्ट्रा राज्य यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास अनेक कुलगुरू व एन. के. यांचे स्नेही व वरिष्ठ प्राध्यापक व्यासपीठावर होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील ज्यांचा एन. के. यांच्याशी संबंध आल ते सारे आप्तस्नेही, सहकारी, विविध पदावर असणारे विद्यार्थीवृंद, हितेच्छु व नातेवाईक हजर होते. अनेकांनी त्यांच्या संबंधी विचार मांडले. डॉ. बावसकरांनी डॉ.एन. के. यांच्याविषयी २५० पानांचा सार सांगितला, "ते बुद्धीवंत, विचारवंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, प्रतिभावंत असे होते. लोकोपयोगी व लोकाभिमुख संशोधन करण्याकरीत त्यांनी अफाट वाचन, अखंड चिंतन व अथक परिश्रमपुर्वक प्रयोगशिलता जोपासून या त्रिसुत्रीचा आपल्या जिवनात अवलंब केला आणि म्हणून त्यांना भाताच्या चार सुत्रीचा शोध गवसला. प्रकृती साथ देत नसतानाही अफाट आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी या संशोधनाच्या प्रसारासाठी झोकून घेतले होते असे त्यांच्या चार सुत्रीवर डॉक्युमेंट्री करताना देशमुख यांनी सांगितले." श्री. विकास देशमुख यांनी त्यांच्या भाषणात कोरडवाहू शेतीची व्याख्या बदलुन संरक्षित पाणी पिकास देणारे शेती नियोजन ही खरी व्याख्या पुढील काळात बदलत्या हवामानात आपणास करावी लागेल आणि कमी पाण्यावर कमी दिवसामध्ये तग धरणाऱ्या वाणांचा शोध घ्यावा लागेल असे सुचविले. या स्मृतीग्रंथाचे संपादन, मांडणी, रचना यामध्ये त्यांचे धाकटे बंधू डॉ. गजानन सावंत यांचा मोलाचा वाटा आहे.