गेलेली व नविन भगव्याची बाग डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे यशस्वी करण्याची आशा

सौ. सुनिता उद्धव रोटे, मु.पो. नाझरे (क.प.), ता. पुरंदर, जि. पुणे, मो. ९८५०५२०३९३



३ वर्षापूर्वी बारामती कृषी प्रदर्शनातून डाळींब पुस्तक घेऊन कृषी विज्ञान मासिकाची वार्षिक वर्गणी भरून मासिक सुरू केले. तेव्हा आमच्याकडे १ एकर डाळींब होते. पुस्तक वाचल्यानंतर या डाळिंबाचा पहिला बहार घेताना डॉ. बावसकर तंत्रज्ञान (सप्तामृत औषधे) नेली होती. या तंत्रज्ञानामुळे बहार चांगला फुटला होता. उत्पादनही चांगले मिळाले होते. मात्र त्यानंतर माझ्या पतीच्या आजारपणामुळे पुन्हा औषधे नेण्यासाठी पुण्याला येणे जमले नाही. त्यानंतर या बागेतील ६०० झाडांपैकी मर रोगांनी ४०० झाडे काढून टाकावी लागली. आता त्यामध्ये फक्त २०० झाडे आहेत. त्यातीलही आज मितीस २० ते २५ झाडांना मर लागली आहे. तसेच नवीन २ वर्षापूर्वी लावलेल्या बागेचा पहिला बहार धरण्यासाठी मागिल अनुभावरून आज (१४ एप्रिल २०१६) डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरण्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आले आहे. सध्या या बागेत २ - ३ झाडावर तेल्या रोग जाणवत आहे.

जुन्या बागेची जमीन अतिशय हलकी मुरमाड होती. जेसीबी शिवाय माती निघत नव्हती. लाल मुरूम आहे. म्हणून मुरुमाच्या वर १ फुट काळी माती भरून हे डाळींब लावले होते. सरांनी सांगितले, "ही बाग जाण्याचे मुख्य कारण म्हणजे डाळींबाला काळी जमीन चालत नाही."

नोव्हेंबर २०१३ मध्ये १५ x १२ फुटावर मध्यम काळ्या जमिनीत लावलेली ३०० झाडे आहेत. तर अर्धा एकर मुरमाड जमिनीत २०० झाडे आहेत. या मुरमाड जमिनीतील बागेचा बहार धरला आहे. १५ मार्चला बागेची छाटणी करून शेणखत १ - १ पाटी प्रत्येक झाडास दिले. सध्या चौकी तयार झाली आहे. ठिबक ३ तास (तासी ६ लि. x २ ड्रिपर x ३ तास = ३६ लि. पाणी) चालवतो. डोक्याएवढी झाडे आहेत. तेव्हा सरांनी सांगितले ७० फळे धरू. यासाठी १ पाटी शेणखत दिलेले आहेच, आता कल्पतरू १ किलो ठिबक जवळ देऊन जर्मिनेटर १ लि. + प्रिझम ५०० मिली + कॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. चे १५० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करणे. म्हणजे १८ दिवसात कळी निघेल. त्यानंतर जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + कॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी करणे. म्हणजे ८० ते १०० हून अधिक कळी निघेल व त्यातील ७० ते ८० फळे धरता येतील. कळी निघाल्यावर ४ तास ड्रिप चालवणे आणि खोडाला चुना १ किलो + मोरचूद १ किलो + गेरू १ किलो + प्रोटेक्टंट १ किलो हे सर्व २० लि. पाण्यात रात्री भिजवून काठीने हालवून तागाच्या कुंच्याने ३ फुटापर्यंत खोडाला पेस्ट लावणे. म्हणजे सुरसा आळी लागत नाही. लिंबापासून संत्रासारखी फळे होईपर्यंत ४ तास (४८ लि. पाणी) ठिबक चालविणे. नंतर ५ तास (६० लि.) व काढणीच्या १ महिना आधिपासून ६ - ७ तास (७२ - ८४ लि.) पाणी द्यावे. १ ते १।। महिन्यांनी कल्पतरू १ किलो, निंबोळी पेंड १ किलो, करंज पेंड १ किलो देणे. उसाच्या पाचटाचे आच्छादन करणे. ४ फुटाच्या आळ्याचा व्यास आहे, त्यामध्ये २ - २ झेंडूची झाडे लावणे. डाळींबाच्या झाडांवर फवारणी करताना खाली झेंडूवर आपोआपच फवारणी होईल आणि डाळींबाच्याच ठिबकवर हा झेंडू वाढेल. त्यामुळे वेगळा फवारणीचा खर्च येणार नाही. तसेच वेगळे पाणी द्यावे लागणार नाही. वरील पेंडीच्या वापरामुळे व झेंडूमुळे सुत्रकृमी होणार नाही आणि गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळीत या झेंडूचे पैसे होतील. त्यापासून डाळींबाचा बराचसा खर्च निघेल असे सरांनी सांगितले.

दर १५ दिवसांनी पुणे ऑफिसला भेटून पुढील फवारण्या घ्याव्यात. अतिविषारी औषधे मारू नयेत. काही औषधे मारायची असली तर पहिल्यांदा आम्हाला विचारणे तसेच सल्ल्यासाठी कुणाला भेटू नये, आपली फसवणूक होऊ शकते. सध्याचा हा बहार ना मृगबहार आहे, ना लेट अंबिया बहार आहे. हा बहार सप्टेंबरमध्ये चालू होऊन ऐन गौरी गणपतीत पैसे होतील. जर व्यवस्थित देखभाल केली तर हा माल निर्यात होईल. साधारण ३५० ग्रॅम ते ७५० ग्रॅमची फळे धरायची आहेत. यामध्ये ३५० ग्रॅमची १०%, बाकीची १ नंबर (४०० ते ५०० ग्रॅमची) ५०%, जंबो १०% आणि २५० ते ३५० ग्रॅमची २०% अशी फळे मिळतील असे सरांनी सांगितले.

याबागेच्या छाटणीसाठी भवानीनगर, बारामतीचे लोक येतात. १५ मार्चला छाटणी केली होती. मुरमाड रानामुळे आपोआपच १००% पानगळ झाली. पुढील मार्गदर्शनासाठी येईल तेव्हा माळेगाववरून माती परिक्षण करून आणणार आहे. तेथे राजेंद्र पवार हे सरांचे विद्यार्थी असल्याचे समजले. येताना सरांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडील फांदी निरीक्षणासाठी आणणार आहे.

पती आजारी असतात. ७ - ८ लाखाचे कर्ज आहे. एकूण ८ - ९ एकर शेती आहे. मात्र शेतीतून अपेक्षीत उत्पादन मिळत नाही. त्यामुळे मुलगा शेतीत लक्ष देन नाही. मुलगा जनावरांचा डॉक्टर आहे. मी स्वत : आणि सुनबाई व १ गडी असे तिघेजण ही शेती करतो. या बागेसाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे ड्रेंचिंग आणि सुनबाई व १ गडी असे तिघेजण ही शेती करतो. या बागेसाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे ड्रेंचिंग आणि फवारणीसाठी जर्मिनेटर २ लि., प्रिझम १.५ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलो घेऊन जात आहे, यासोबत कॉपरऑक्सीक्लोराईड वापरणार आहे.

दुसऱ्या २५ ते ३० गुंठ्यातील काळ्या जमिनीतील ही नवीन बाग आहे. आतापर्यंत बहाराचे नियोजन नसल्याने पाणी अवेळी कधीही दिले. बागेची खोडे नुसती वाढली आहेत. १ महिना पाणी बंद करूनही बाग तावावर आली नाही. झाडे वाढली आहेत. मध्यंतरी थोडा पाऊस झाल्याने आगारे निघत आहेत. पालवी हिरवीकच्च आहे. आता पानगळ होणे अवघड आहे. त्यासाठी इथ्रेल मारावे लागेल. तत्पूर्वी १० -१२ दिवस अगोदर भेटण्यास सरांनी सांगितले.

या बागेला (३०० झाडांना) वरील प्रमाणेच खोडाला पेस्ट लावून बुंध्याजवळ करंज पेंड १ किलो देणे. तुमच्या भागात करंज पेंड सहज उपलब्ध होते. निंबोळीपेक्षा करंज पेंड सुत्रकृमीवर अधिक प्रभावी असल्याचे सरांनी सांगितले. मी सरांची सकाळी ९ वाजल्यापासून वात पाहत होते. सरांनी मला वडिलांपेक्ष चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे मानसिक आधार मिळाला.