चिंचेपासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


चिंच पिकाची लागवड केल्यास लहान शेतकऱ्यांना कमी खर्चात आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच चिंच फळांवर प्रक्रिया करून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ स्थानिक बाजारपेठेसाठी आणि पुढे निर्यातीसाठी करून आर्थिक फायदा कमी भांडवलाची गुंतवणूक करून करता येतो. चिंचेवर प्रक्रिया करून पेस्ट पेय, चटणी, कॉर्डियन, पल्प पावडर, सॉस, पोळी, लोणचे, सिरप असे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. विशेष म्हणजे या पदार्थांना बाजारात चांगली मागणी असते.

डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने विकसीत केलेल्या 'विक्रम' चिंचेचा पाणीपुरी, ओली भेळ, पन्हे यामध्ये वापर केला असता ती अतिशय चविष्ट होते. त्यामुळे मुल्यवर्धनाच्या दृष्टीने या चिंचेला परदेशातील भारतीय आणि आशियन लोकांना तसेच आखाती राष्ट्रात, सार्क राष्ट्रे त्याचबरोबर चीन, जपान, थायलंड, फिलीपाईन्स, मलेशिया, न्युझीलंड, ऑस्टेलिया या पुर्वेकडील दक्षिण आशियातील अति उष्ण राष्ट्रांत आरोग्य समृद्धीसाठी अतिशय चांगली मागणी राहील.

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे चिंचेची झाडे शेताच्या बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा अथवा नदीच्या कडेला किंवा डोंगरावर आढळतात. चिंचेची शास्त्रोत्क पद्धतीने सलगपणे केलेली अलगद अतिशय कमी क्षेत्रावर आहे. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजने अंतर्गत फलोद्यान विकास कार्यक्रमामध्ये या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.

महाराष्ट्रामध्ये अंदाजे २९ लाख हेक्तर पडीक जमिनीचे क्षेत्र उपलबध आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचे कडे असलेल्या पडीक क्षेत्रात चिंच पिकाची लागवड केल्यास लहान शेतकऱ्यांना आर्थिक फायदा विशेष काळजी न घेता होऊन उपलब्ध असलेल्या चिंच फळांवर प्रक्रिया करून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ स्थानिक बाजारपेठेसाठी आणि पुढे निर्यातीसाठी करून आर्थिक फायदा कमी भांडवल गुंतवणूक करून करता येतो.

व्यापारीदृष्ट्या चिंच पिवळ्या रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची अथवा लालसर पिवळ्या रंगाची असते. याच प्रकारच्या चिंचेची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. चिंच फळे पक्व झाल्यावर व झाडावरच वाळल्यावर काढणी करून वरील टरफले आणि आतील चिंचोळे काढून वर्षभर साठवून ठेवता येते.

या चिंच फळात सरासरी ३०% गर, ४० टक्के चिंचोका आणि ३० टक्के वरील टरफले व तंतुमय पदार्थ असतात.

चिंच फळे पुर्ण वाळल्यानंतर गरामध्ये अंदाजे ३८ टक्के पाण्याचे प्रमाणे असते.

वाळवून काढलेला गर मीठ किंवा साखर यांचे मिश्रण करून बराच काळापर्यंत साठवून ठेवला जातो आणि हाच गर पुढे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी वापराला जातो. चिंच फळातील पोषक द्रव्ये.

१०० ग्रॅम खाण्यायोग्य चिंच गरामध्ये खालील पोषक द्रव्ये उपलब्ध असतात.

*   कॅलरीज   २३९ कॅसिएल  
*   कार्बोहायड्रेटस   ६२.५० ग्रॅम  
*   प्रोटिन्स   २.८० ग्रॅम  
* एकूण स्निग्ध पदार्थ   ०.६० ग्रॅम  
* तंतुमय पदार्थ   ५.१ ग्रॅम  
* फोलेटस   १४ मि.ग्रॅ. 
* नायसिन   १.९३८ मि.ग्रॅ.  
*   पेंटोथेनिक आम्ल   ०.१४३ मि.ग्रॅ. 
*   पायरीडोक्झिन   ०.६६ मि.ग्रॅ.  
*   थायमिन   ०.४२८ मि.ग्रॅ.  
*   जीवनसत्त्व अ   ३० आयू  
*   जीवनसत्त्व क   ३.५ मि.ग्रॅ.  
*   जीवनसत्त्व इ   ०.१० मि.ग्रॅ.  
*   जीवनसत्त्व के   २.८ मि.ग्रॅ.  
*   टारटारिट आम्ल   ०.७३ मि.ग्रॅ.  
*   सोडियम   २.८ मि.ग्रॅ.  
*   पोटॅशियम  ६२८ मि.ग्रॅ.  
*   कॅल्शियम   ७४ मि.ग्रॅ.  
*   तांबे   ८६ मि.ग्रॅ. 
*   लोह   २.८० मि.ग्रॅ.  
*   फॉस्फरस   ११३ मि.ग्रॅ.  
*   सेलेनियम   ०.१० मि.ग्रॅ. 
*   जस्त   ०.१० मि.ग्रॅ.  
*   कॅरोटिन   १८ मि.ग्रॅ.  


चिंचेच्या फळापासून चिंचगर, त्वरित पिण्यासाठी सरबत (Ready to Serve) कॉर्डियल्स, लोणचे, चटणी, रस, पावडर इत्यादी पदार्थ प्रक्रिया करून साठवून / तयार करून ठेवता येतात. वरील तयार पदार्थ मोठ्या बाजारपेठेसाठी / मॉल / सुपर मार्केट तसेच निर्यात करण्यासाठी योग्य आहेत. स्थानिक किंवा जवळच्या बाजारपेठेसाठी चिंचपोळी, चिंचेचा सॉस, चिंचोका पावडर हे पदार्थ तयार करता योतात. हे पदार्थ मोठ्या बाजारपेठेसाठी तसेच निर्यात करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

प्रक्रिया पदार्थ तयार करतांना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

१) कच्च्या मालाची निवड:

प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी मुख्यत्वे चिंच फळांची निवड करणे आवश्यक आहे. फळे चांगली पिकलेली, कीड, रोगमुक्त, जास्त न पिकलेली आणि योग्य पद्धतीने वाळलेली असावीत.

२) प्रक्रिया तयार करण्यासाठी भांड्यांची निवड करणे :

यासाठी स्टेनलेसटीलची भांडी वापरावीत. कारण चिंच हे आम्लधर्मी फळ आहे.

१) चिंच पेस्ट तयार करून साठविणे :

प्रथम चिंचेचा गर उपलब्ध होणेसाठी चिंच फळे पाण्यात ५ मिनिटे उकळून घ्यावीत. लाकडी पात्याने हलवित जावे. यामुळे चिंच फळे नरम होऊन बी (चिंचोळे) त्वरित बाहेर काढता येतात किंवा गर आणि चिंचोके वेगळे करण्यासाठी पल्प वेगळा करण्याच्या मशीनचा उपयोग करावा. गर उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा १० - १२ मिनिटे ग्राम करून घ्यावा. त्यामुळे गर घट्ट स्वरूपात तयार होतो. पल्प किंवा पेस्ट गरम असतानाच त्यामध्ये साठवणुकीमध्ये पेस्ट बुरशीजन्य होऊ नये म्हणून पोटॅशियम मेटा बाय सल्फेट प्रिझर्वेटिव्ह १०० मि.ग्रॅम प्रती एक किलो पेस्ट या प्रमाणात मिसळून घ्यावे. यानंतर गरम उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेल्या प्लास्टिक कप (२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १००० ग्रॅम आकारमानाचे) मध्ये तयार झालेली पेस्ट भरून कपांना झाकणे लावून सीलबंद करावे. प्रत्येक प्लास्टिक कपवर पेस्टचे वजन, दिनांक, उत्पादकाचे नावांचे लेबल तयार करून लावावे. तयार झालेल्या पल्पमध्ये भरपूर प्रमाणात पेक्टिन आणि रिड्युसिंग शुगरचे प्रमाण असते. त्याचप्रमाणे या तयार झालेल्या पल्पमध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय आम्ल असून यापैकी ९८% टारटारिक आम्ल असते. पल्प घरगुती आहारात वापरण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात औधोगिक क्षेत्रात वापरला जातो. पल्पला एक प्रकारचा सुवास तो २ अॅसिटीफ्यूरानपासून येतो.

पल्प उत्पादन प्रमाण :

* वाळलेली चिंच १२.५ किलो

* तयार झालेला पल्प - ७.५ किलो

* पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट - १.२ ग्रॅ. (अंदाजे चहाचा अर्धा चमचा)

* पॅकिंग - १२५ ग्रॅम आकारमानाच्या प्लास्टिक कप्समध्ये

* एकूण कप्स - ६० नग

* एकूण पल्प वजन - ७.५ किलो

२) ताबडतोब वारपण्यात येण्यासाठी तयार करण्यात येणारे चिंच पेय (रेडी - टू- सर्व्ह) पद्धत :

* प्रथम चिंचेचा पल्प तयार करून घ्यावा.

* दुसऱ्या भांड्यात साखर पाण्यात टाकून पुर्ण विरघळेपर्यंत तापवावे (प्रमाण १ लिटर पाणी +१८५ ग्रॅम साखर या प्रमाणात)

* साखर विरघळल्यानंतर त्यात चिंच पल्प टाकावा व तयार झालेले मिश्रण ९५ अंश सें.ग्रॅ. तापमानात १५ मिनिटे ढवळून घ्यावे. (चिंचेचा पल्प १३० ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात)

* मिश्रणात प्रति लिटर १०० मि.ग्रॅ. सोडियम बेंझोएट (प्रिझरव्हेटीव्ह) या प्रमाणात टाकावे व २.६० ग्रॅम मीठ/लिटर पाणी प्रमाणे टाकावे.

* मिश्रण थंड होऊन न देता त्याच तापमानात निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून लगेच झाकणे लावून सील करावे. बाटल्या थंड झाल्यावर तयावे लेबल लावावे.

* अंदाजे उत्पादन

पाणी १९ लिटर, चिंच पल्प २.५ कि.ग्रॅम, साखर ३.५ कि.ग्रॅ., मीठ ५० ग्रॅम, सोडियम बेंझोएट २.५ ग्रॅम (१ चहाचा चमचा), उत्पादन १९ लिटर (किंवा १९० मिली आकारमानाच्या १०० बॉटल्स)

३) चिंच पेय - आइस पॅकेटस तयार करणे - (Tamarind Ice Packets):- वर दिलेल्या ताबडतोब वारपण्यात येण्यासाठी तयार करण्यात येणारे चिंच पेय टायर पद्धतीचा अवलंब करून पेय निर्जंतुक केलेल्या जाड पॉलिथिनच्या पिशव्यांचा आकार ५ सें.मी. रुंद आणि १२.५ सें.मी. लांब असून यामध्ये ५० मिली पेय भरले जाते.

* पद्धत :- पाणी १० लिटर, चिंच पल्प १.३०० कि.ग्रॅ. साखर १ किलो ८०० ग्रॅम, मीठ २५ ग्रॅम, उत्पादन ५० मिली आकारमान क्षमतेची २०० पॅकेटस तयार होतात. फ्रिजरमध्ये साठवून ठेवावेत.

४) चिंच चटणी : - (Tamarind Chutney) : चिंच फळापासून चिंच चटणी प्रक्रिया करून खालीलप्रमाणे तयार करता येते.

चिंच पल्प १ किलो, खजूर ५०० ग्रॅम, साखर १.२ कि.ग्रॅ., व्हिनेगर ३५० मिली., तिखट पावडर ५० ग्रॅम, मोहरी ५० ग्रॅम, आले ४० ग्रॅम, लसूण २० ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, लवंग ४ ग्रॅम वेलदोडा ३ ग्रॅम.

उत्पादन २ किलो (२९० ग्रॅम आकारमानाच्या ७ बॉटल्स तयार होतात)

(वरील प्रमाणात अधिक मात्रेत घेऊन जास्त उत्पादन करावे)

५) चिंच कॉर्डियल (Tamarind Cordial) : चिंच फळापासून चिंच कॉर्डियल पेय खालीलप्रमाणे पद्धत वापरून तयार करता येते.

चिंच पल्प ४७५ ग्रॅम, पाणी ५५० मिली, साखर ५७० ग्रॅम, सी.एम.सी (कार्बोक्सी मिथिल सेल्यूजोज) १.५ ग्रॅम, सोडियम बेन्झोएट ०.६ ग्रॅम.

उत्पादन : ७५० मिली आकारमानाची एक बॉटल (७५० मिली कॉर्डियल) वरील प्रमाण घेऊन अधिक उत्पादन करावे.

६) चिंच पल्प पावडर : चिंचेचा गर स्प्रे ड्रॉइंग पद्धतीने वाळवून आणि पुर्ण सुकल्यानंतर दळून बारीक पावडर करता येते. ही पावडर निर्वात पिशव्यांमध्ये भरून ठेवल्यास पावडर बर्षभर केव्हाही वापरता येते. या चिंच पावडरला आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फार चांगली मागणी असते. उत्कृष्ट चिंच पावडर मध्ये खालील गुणधर्म असतात.

घटक चिंचपावडर -टक्के/प्रमाण

पाणी ३.५ ते ८.८

टारटारिक आम्ल ८.७ ते ११.१

इनव्हर्ट साखर १५.८ ते २५.०

प्रोटीन्स १.७ ते २.७

स्टार्च २०.० ते ४१.५

अॅश २.१ ते ३.२

कॅल्शियम ७४.१४ मिली ग्रॅम

पोटॅशियम २३.८ ते २.७ मिली ग्रॅम

७) चिंच सॉस - चिंच सॉस तयार करण्यासाठी

चिंचेचा गर १ कि.ग्रॅ., साखर १.५ कि.ग्रॅ. लाल मिरची पावडर १०० ग्रॅ., जिरा पावडर २० ग्रॅम. हिंग पावडर २० ग्रॅ., मीठ २०० ग्रॅम मसाला ५० ग्रॅम , व्हिनेगर ८० मिली हे घटक लागतात.

प्रथम वजन करून घेतलेल्या चिंचेच्या गरात प्रमाणत साखर टाकून मिश्रण गरम करण्यास ठेवणे.

वरील सर्व मसाल्यांची पुड एका मलमलच्या कापडाच्या पुरचंडीमध्ये बांधुन ती पुरचुंची मिश्रणात बुडवून ठेवावी. मधून मधून ही पुरचुंडी पळीने दाबावी. म्हणजे मसाल्याचा अर्क मिश्रणात उतरण्यास मदत होते. नंतर मिश्रण गरम असतानाच मिश्रणात मीठ टाकून थोडा वेळ गरम करावे. ०.३५० मिलिग्रॅम सोडियम बेंझोएट मिसळावे. हा तयार झालेला सॉस निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरून, बाटल्या हवाबंद करून, परत बाटल्या गरम करून थंड करून, लेबल लावून थंड आणि करोडया जागी साठवून ठेवाव्यात.

८) चिंच पोळी : ज्याप्रमाणे आंब्याची पोळी केली जाते. त्याचप्रमाणे चिंचेच्या गरापासून उत्तम प्रतीची पोळी तयार करता येते. यासाठी चिंचेच्या गरामध्ये एकास एक (१ :१) या प्रमाणात साखर टाकून हे मिश्रण ९० अंश सें. तापमानात थोडा वेळ गरम करून पातळ थर ताटामध्ये ओतून वाळवावेत. असे एकावर एक थर देऊन थराची जाडी १.५ सें.मी. येईपर्यंत थर द्यावेत. वाळल्यानंतर पोळी कापून, वजन करून लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावी. ही पोळी १२ - १३ महिने चांगली टिकते.

९) चिंच लोणचे : चिंच फळापासून चिंच लोणचे तयार करता येते. लोणचे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी असते. याकरिता उत्तम प्रतीच्या पुर्ण पिकलेल्या चिंच फळाची निवड करून वरची वाळलेली टरफले काढून चिंच अंदाजे १२ तास थंड पाण्यात भिजवून ठेवणे. त्यानंतर फळांमधील चिंचोके वेगळे करून चिंच पल्प (गर) वेगळा करावा. १ किलो ग्रॅम चिंच पल्पमध्ये १ किलो साखर मिसळून मिश्रण उकळून घ्यावे. उकळताना मिश्रण सारखे पळीने हलवत राहावे. या मिश्रणामध्ये मोहरी डाळ २०० ग्रॅम, तिखट पावडर २०० ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम टाकून मिश्रणात मिसळणे. सर्व घटक मिश्रणात मिसळल्यानंतर २५० ग्रॅम मोहरीचे तेल गरम करून व नंतर थंड करून टाकावे. हे तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये किंवा प्लास्टिक बॅगमध्ये भरावे. खोलीच्या तापमानात बाटल्या /पिशव्या ठेवून थंड होण्यासाठी ठेवाव्यात. थंड झल्यानंतर बाटल्यांना झाकणे लावून थंड ठिकाणी ठेवूं द्यावे. १२ ते १५ महिन्यापर्यंत हे चिंच लोणचे चांगल्या स्थितीत राहते.

१०) चिंच सिरप - तयार करणे : चिंच सिरप तयार करण्यासाठी चिंचेच्या गरांमध्ये थोडे पाणी टाकून नरम होईपर्यंत उकळून घ्यावे. त्यानंतर मलमलच्या कपड्यामधून तयार झालेले मिश्रण गाळून घ्यावे. खाली भांड्यात चिंचेचा रस उपलब्ध होईल. या १ लिटर रसामध्ये २ चहाचे चमचे खाण्याचा सोडा मिसळून गरम करावे. मिश्रण उकळताना ते अंदाजे ५०० मि.ली. झाले. म्हणजे गरम करणे थांबवून रसावर उकळत असताना वर आलेली साय काढून टाकावी व रस पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. तयार झालेल्या ५०० मि.ली. रसामध्ये १२५ ग्रॅम साखर टाकून मिश्रण २० मिनिटे गरम करून घ्यावे. हे तयार झालेले चिंच सिरप थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरून पॅकबंद करावे.

१४) चिंच कॅन्डी : स्वच्छ केलेली, तुर्ण पिकलेली व वाळवून तयार झालेली चिंच फळे निवडून घ्यावीत. फळातील चिंचोके काढून टाकावेत. स्टीलच्या भांड्यात ही फळे ठेवून त्यावर तयार केलेला साखरेचा पाक टाकावा. साखरेचा पाक करण्यासाठी १ किलो साखरेत २५० मि.ली. पाणी टाकून ६२ सें.ग्रॅ. तापमानात उकळून घ्यावे. याला एकतारी पाक असे संबोधले जाते. हा फळांवर एकतारी पाक टाकल्यावर ३ दिवसपर्यंत फळे या पाकात भिजत ठेवावीत. या वेळेस फळांवरील पाक घट्ट होतो. नंतर हाताने फळांचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून साठवून ठेवावेत.

१५) चिंचोका पावडर : चिंच फळातून गर वेगळा केल्यांनतर गरातील चिंचोके उपलब्ध होतात. या चिंचोक्यावर प्रक्रिया करून चिंचोका पावडर तयार करता येते. या पावडरला देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत फार मोठी मागणी असते. औद्योगिक क्षेत्रात या पावडरचा उपयोग मोठ्या प्रमाणात कापड तयार करणाऱ्या मिल्समध्ये पेपर मिल्स, दारूगोळा कारखान्यामध्ये, प्लायवूड कारखान्यामध्ये, सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी, तंबाखु कारखान्यामध्ये तसेच पेन्ट तयार करणाऱ्या कंपनीमध्ये होतो. या पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स व प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असल्याने चिकटणार पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तसेच या पावडरचा उपयोग फुड इंडस्ट्रीमध्ये उदा. केचअप, आईसक्रिय, सॉस, सरबत, बेकरी पदार्थ अशा अनेक पदार्थांमध्ये मिश्रणासाठी वापरतात.

चिंचोका पावडर तयार करण्याची पद्धत:

१) निवडणे : चिंचोके बियांमध्ये काही इतर अनावश्यक पदार्थ असल्यास ते निवडून बाजूला टाकावेत. उत्कृष्ट प्रतीच्या चिंचोक्यांची निवड करावी.

२) चिंचोके गरम करण्याची क्रिया: निवडून घेतलेले चिंचोके चांगल्या प्रतीचे आहेत याची खात्री केल्यानंतर चिंचोक्यावरील टरफल (शेल) काढून टाकण्यासाठी व पांढऱ्या - करड्या रंगाचे चिंचोके पुर्णपणे वाळलेले मिळण्यासाठी १४० अंश से. तापमानात १० मिनिटे गरम करावे. यामुळे चिंचोक्यामध्ये असलेल्या पाण्याचे प्रमाण पुर्णपणे कमी झाल्याने वरील टरफल त्वरीत निघून जाण्यास मदत होते. या टरफलांचे प्रमाण एकूण वजनाच्या २८ ते २९ टक्के असते. चिंचोक्यांना गरम करण्याची क्रिया फार काळजीपुर्वक करावी. सुचविलेल्या तापमानापेक्षा जास्त तापमान झाल्यास चिंचोक्यांचा राग गडद तपकिरी होतो व यापासून तयार झालेल्या पावडरीला रंग बदलल्यामुळे मागणी नसते.

३) आवरण काढून टाकणे (Stripping ) : चिंचोक्यांवर गरम तापमानाची प्रक्रिया केल्यामुळे चिंचोक्यावरील आवरण त्वरित निघून जाते. त्यानंतर पांढऱ्या रंगाचे चिंचोके वेगळे काढावेत.

४) पांढऱ्या रंगाचे चिंचोके वेगळे करणे :

चिंचोक्यावरील टरफल पुर्ण निघाल्यानंतर पांढरे चिंचोके पुढील पावडर तयार करण्यासाठी वापरावे.

५) पांढऱ्या चिंचोक्याची पावडर ग्राइंडिंग मशीनमध्ये तयार करणे :

ग्राइंडिंग मशीनमध्ये चिंचोक्यांची बारीक पावडर करावी.

६) पावडर चाळणीतून गाळणे : तयार झालेली पावडर ६० मेश आकाराच्या चाळणीमधून गाळून घ्यावी.

७) पॅकिंग : तयार झालेली पावडर पॉलिथिन एल.डी.पी.इ. पिशव्यांमध्ये भरून ७ प्लाय करोगेटेड बॉक्सेसमध्ये पॅकिंग करावे. प्रत्येक पिशवीमध्ये २५ कि.ग्रॅ. किंवा ५० कि. ग्रॅ. पावडर भरावी. घरगुती पावडर ५०० ग्रॅम. १०० ग्रॅम पर्यंत पावडर करून जाड पॉलिथिन बॅगमध्ये पॅकिंग करावे. पॅकिंग केलेले बॉक्सेस थंड जागी साठवून ठेवावेत. अशी पावडर १२ - १६ महिन्यापर्यंत चांगली साठवून ठेवता येते.