लागवड वैशाखी मुगाची

सर्व कडधान्यामध्ये मूग श्रेष्ठ आहेत. मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे मिळतात. हिरवा मूग सर्वश्रेष्ठ आहे. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए. बी. ही व्हिटॅमिन्स, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहे. हे लक्षात घ्यावे. मूग कफ, पित्त व रक्तसंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, असळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त असतात. औषधे म्हणून काढा करण्याचा प्रघात आहे.

ज्वारामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानाचा काढा घ्यावा. जीर्णज्वरात ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकारिता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे. डोळे आल्यास मुगाची पुरचुंडी डोळ्यावर बांधावी.

पिवळ्या मुगास कीड लवकर लागते. त्याच्यात भुंगे लवकर होतात. पिवळ्या मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक आहे. थोडी पिठीसाखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळ्या मुगाचे पीठ उत्तम टॉंनिक आहे. कृश मुले, दुपारी उशिरा जेवणारी चाकरमानी मंडळी यांनी सकाळी चहा ऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या पीठाचे लाडू खावे. बाळंतीणीस भरपूर दूध घेण्याकरिता मुगाच्या पिठाचे लाडू तत्काळ गुण देतात.

शारीरिक कष्ट खूप करावयास लागणार्‍यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी. खूप लठ्ठ व्यक्तींनी मुगाची आमटी नियमित घ्यावी. कृश व्यक्तींनी मुगाची उसळ खावी. मुगामुळे मेद वाढत नाही. पण स्नायूंना बल मिळते. अर्धांगवात, संधिवात, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे त्वचेचे विकार, कावीळ,जलोदर, सर्दी पडसे, खोकला, दमा, स्वरभंग तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक अन्न आहे. त्याकरिता मूग भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कढण हे अर्धांगवात, मधुमेह, रक्तदाबवृद्धी या विकारात उपयुक्त आहे. घशाच्या, जिभेच्या, गळ्याच्या कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणे त्रासाचे होते. त्यावेळेस हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन: पुन्हा पाजावे, शरीर तग धरते. आयुष्याची दोरी बळकट असली तर नुसत्या मुगाच्या पाण्यावर माणसे कॅन्सरवर मात करू शकतात. मधुमेहात भरपूर मूग खावे. थकवा येत नाही.

डोळ्याचे कष्टसाध्य किंवा असाध्य विकारात मुगाचा विविध प्रकारे उपयोग होतो. रेटिना, काचबिंदू, मधुमेह किंवा रक्तदाब वाढल्यामुळे क्षीण होणारी दृष्टी या अवस्थेत मूग भाजून त्याचे पाणी, गाईच्या दुधात शिजवून केलेली मुगाच्या पिठाची खीर किंवा पायसम, मुगाच्या पिठाचे पापड, मुगाची उसळ, मुगाच्या डाळीची खिचडी असे विविध प्रकारे मूग वापरावेत. चवीकरिता हिंग, जिरे, मिरी वापरावी. मुगाच्या आहारातील वाढत्या वापराने काहीच नुकसान होत नाही. डोळ्यांना नवीन तेज प्राप्त होते.

जुनाट जखमा, मधुमेही किंवा महारोगाच्या जखमा भरून येण्याकरिता कटाक्षाने मुगाचा भरपूर वापर करावा. जखम लवकर भरून येतात. चहा, तंबाखू, जागरण, दारू, सिगारेट या कारणांनी ज्यांचे तोंड येते. त्यांनी मुगाचे वरण खावे. मुगाचे वरण दाट हवे. नुसती पातळ आमटी उपयोगाची नाही. ज्यांना मळ कमी पडत असेल आहार कमी असल्यामुळे मलावरोघ हा विकार आहे. अशांनी मुगाची असळ आवश्यक खावी. सोबत लसूण वापरावा. मुगाच्या असळीने मळ भरपूर तयार होतो. मळाचा खडा होत नाही.

जुलाब होत असल्यास मुगाच्या काढ्यात मध मिसळून घ्यावा. जुलाब थांबतात. थकवा येत नाही. मोठी शस्त्रकर्मे, दिर्धकालीन आजार, अनेक दिवसांचा ताप यामुळे ताकद गेली असल्यास अनेक अॅमिनो अॅसिड्स असलेल्या मुगाचे कढण नवीन जीवन देते.

मूग हे अत्यंत महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन विचारात घेता देशात प्रथम क्रमांक लागतो. मूग कमी कालावधीतच तयार होते. खरीप व रब्बी हंगामात घेता येते. त्याचप्रमाणे च्वच्छ सुर्यप्रकाश व उष्ण हवामान यामुळे उन्हाळ्यात चांगला पोसतो व भरपूर उत्पादन मिळते. शिवाय या पिकावर उन्हाळ्यात रोगाचे प्रमाण कमी असते. सिंचनाची सुविधा असल्यास उन्हाळ्यात मुगाचे चांगले उत्पन्न मिळते.

जमीन : मूग या पिकासाठी जमीन ही मध्यम ते भारी असावी. त्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होणार असावा.

लागवड : थंडीचा अंमल कमी झाल्यावर उन्हाळी मूग हा फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून घ्यावी. जास्त उशीरा पेरणी केल्यास पीक जून - जुलैच्या भर पावसात काढणीस येते. त्यामुळे शेंगाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

लागवडीचे अंतर : दोन ओळीत ३० सेमी आणि २ रोपात १० सेमी अंतर ठेवून पाभरीने मूग पेरावा. एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरे होते. पेरणी केल्यावर पाणी व्यवस्थित देण्यासाठी ४ -५ मीटर रूंदीचे सारे ओढून घ्यावेत .

बिजप्रक्रीया : मूग विशेषत: मूळकुजव्या रोगास बळी पडतो. अशा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व उगवण लवकर व १०० % होण्याकरिता १ किलो बियाण्यास २० ते २५ मिली जर्मिनेटर + १ लि पाणी या प्रमाणात १ ते २ तास भिजवून सावलीत वाळवून मग पेरावे.

जाती : मूगाच्या वैभव, कोपरगाव, फुले एम. २, एस. ८, बी.एम. ४, के. ८५१ या जाती आहेत .

१) वैभव : ही जात ७० ते ७५ दिवसात काढणीस येते. याचे दाने आकर्षक, हिरवे, टपोरे असतात. भुरी रोगास प्रतिकारक्षम असते. एकरी उत्पन्न ४.५ ते ५.५. क्विंटल येते.

२) कोपरगाव : ही जात ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. याचे दोने आकर्षक, टपोरे, हिरवे चमकदार असतात. ही जात भुरी रोगास बळी पडते. महाराष्ट्रात लागवडीसाठी चांगली आहे. एकरी उत्पन्न ३ ते ४ क्विंटल येते.

३) फुले एम. २ : ही जात ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. याचे आकर्षक मध्यम, हिरवे दाणे असतात. खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी योग्य आहे. ४.५ ते ५ क्विंटल एकरी उत्पादन येते.

४) एस ८ : ही जात ६० ते ६५ दिवसात तयार होणारी असून खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये घेत येते. उत्पादन एकरी ४.५क्विंटल पर्यंत मिळते.

५) बी. एम. ४ : ही जात ६५ ते ७० दिवसात काढणीस येते. विशेष म्हणजे ही जात करपा रोगास प्रतिबंधक असून दाणे हिरवे, मध्यम आकाराचे असतात. महाराष्ट्र, गुजरात तसेच मध्यप्रदेशमध्ये लागवडीस योग्य जात आहे. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळते.

६) के ८५१ : निमपसरट वाढ होत असून दाणे मोठे असतात. लागवडीपासून ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. महाराष्ट्रामध्ये लागवडीस योग्य. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळते.

पाणी नियोजन : उन्हाळी मुगास पेरणीनंतर प्रथम ३ ते ४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पेरणीपुर्वी रान ओले करून वापश्यावर आल्यानंतर पेरणी करावी. पहिल्या हलक्याश्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. एकूण ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपुर्ण कालावधीत द्याव्यात. विशेषत: पीक फुलोर्‍यात असताना व शेंगा तयार होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.

कीड व रोग : मूगावर उन्हाळ्यात किडीचा प्रादुर्भाव कमी पडत असला तरी प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पाने खाणारी व शेंगा पोखरणारी अळी व भुंगेरे दिसून येतात. त्याकरिता तसेच अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन १०० मिली. + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + २०० लि.पाणी.

आंतरमशागत : पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी हलकीशी कोळपणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास १० ते १२ दिवसांनी परत एखादी खुरपणी करावी.

खते : मूगाचे भरघोस उत्पादनासाठी लागवडीपुर्वी पुर्ण कुजलेले शेणखत किंवा कल्पतरू सेंद्रिय खत एकरी १ बॅग (५० किलो ) द्यावे. नंतर १ महिन्याचे २० ते २५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत मुगाच्या झाडापासून काही अंतरावर द्यावे. या खतांमुळे हवेतील ओलावा खेचून मुळांभोवती गारवा निर्माण होतो. त्यामुळे पाण्याच्या पाळ्या कमी लागतात व जमीन भुसभुशीत होऊन पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात.

काढणी : उन्हाळी मूग काढणीस ६० ते ६५ दिवसांनी तयार होते. जवळजवळ ७० ते ७५% शेंगा तयार होऊन वाळल्यावर पहिली तोडणी करावी. तयार झालेल्या शेंगा ३ ते ४ तोड्यामध्ये तोडून घ्याव्यात. तोडलेल्या शेंगा वाळवून व काठीने झोडपून मळणी करावी. नंतर उपणणी करून घ्यावी. तयार झालेले धान्य नीट वाळवून मगच साठवण करावी.

Related Articles
more...