वेलदोड्याची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर

जगातील महत्त्वाच्या आणि किंमती मसाल्याच्या पदार्थांमध्ये वेलदोड्याची गणना केली जाते. अगदी थोड्या मोजक्या भागात जरी वेलदोड्याची लागवड होत असली तरी पैसा मिळवून देणारा वेलदोडा हा अत्यंत महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ अति प्राचीन काळापासून सर्वांच्या परिचयाचा पदार्थ अति प्राचीन काळापासून सर्वांच्या परिचयचा आहे. अशा महत्त्वाच्या मसाल्याच्या पिकाचे मूळस्थान भारत हेच होय. अतिप्राचीन काळापासून वेलदोड्याची लागवड भारतात केली जाते. भारताच्या पश्चिम मलबार किनाऱ्यावरील डोंगराळ भागात ह्या पिकाची लागवड प्रथमत: आढळून आली. भारतीय वेलदोड्यांना विशिष्ट प्रकारची चव असल्यामुळे त्यांना परदेशांत जास्त मागणी असते.

भारतात मुख्यत्वेकरून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम ह्या राज्यांत वेलदोड्याची लागवड केली जाते. सिलोन थायलंड, ग्वाटेमाला, इंडोचायना, सिक्कीम आणि नेपाळ या देशांतही वेलदोड्याचे पीक घेतले जाते. पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम आणि नेपाळ या राज्यांतील वेलदोडे असोमम (Amomum) जातीचे आहेत. मात्र या जातीचे वेलदोडे निकृष्ट प्रतीचे समजले जातात.

भारतीय वेलदोड्याची मोठ्या प्रमाणात परदेशांत निर्यात होते. जागतिक बाजारपेठेत ७० % वेलदोडे भारतीय असतात. जागतिक बाजारपेठेत २० % ग्वाटेमालातून व १०% श्रीलंकेतून निर्यात होतात. वेलदोड्याच्या निर्यातीमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो.

उपयोग : तोंडाला चव येण्यासाठी वेलदोडे विड्याच्या पानातून खातात. स्वाद आणण्यासाठी खाण्याच्या पदार्थात वेलदोडे घालतात. औषधातही वेलदोड्याचा उपयोग करतात. वायपेरीन ह्या नावाचा घटक वेलदोड्याचा उपयोग करतात. वायपेरीन ह्या नावाचा घटक वेलदोड्यात असतो. पायपेरॉनल हा त्यापासून तयार होणारा एक पदार्थ आहे.

वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोन : वनस्पतीशास्त्रात वेलदोड्याच्या झाडाला अॅलटॅरीया कार्ड्यामम (Elettaria Cardamum) या नावाने ओळखले जाते. वेलदोडा ही बहुवार्षिक वनस्पती असून तिची लागवड कंदापासून केली जाते जमिनीत लावलेल्या मुख्य कंदापासून सभोवार असे सुमारे १० - १२ गड्डे तिरकस वाढतात. मुख्य झाडाच्या कंदाचा किंवा गड्ड्याचा व्यास साधारणत: ४ ते ५ सें. मी. इतका असतो. अशा आजूबाजूच्या गड्ड्यापासून घायपाताप्रमाणे पानांचे देठ बाहेर येतात. ह्या पानाचा देठ लांबसडक असून टोके अणकुचीदार असतात. पानांचा रंग गडद हिरवा असून लांबी ३० ते ९० सें. मी. व रुंदी ७ ते १५ सें. मी. इतकी असते. झाडाची उंची साधारणत: १.८० मीटर ते ३.६० मीटर इतकी असते. जमिनीतील खोडापासून फुटणाऱ्या उभट किंवा थोडेसे वाकलेल्या धुमाऱ्याची लांबी वेगवेगळ्या जातीनुसार ६० सें. मी. पासून १२० सें. मी. पर्यंत असते. फळांच्या आझ्याने काही वेळेस त्यांचा आकार अनियमित असा होऊन जातो. वेलदोड्याच्या मेजर नावाच्या एक जातीत हे धुमारे शेवटपर्यंत उभट असेच राहतात. एका झाडावर दोन्ही प्रकारची (Bisexual) नर आणि मादी फुले असतात. पक्व झालेल्या वेलदोड्याच्या सुट्या - सुट्या अशा एकूण १५ ते २१ बिया असतात. फळ त्रिकोणी आकाराचे असून तिन्ही बाजूंना आतून ह्या बिया समप्रमाणात चिकटलेल्या असतात. वेलदोड्या चे आकारमान त्यांच्या जातीप्रमाणे भिन्न असते. उदा. गोल किंवा पुंजका असलेले जावा वेलदोडे, मोठे बी असलेले कारमिना वेलदोडे रंगाने तांबडे असतात. ह्या वेल्दोड्यांना बाजारात मागणी फारच कमी असते. बंगाली वेलदोडे मोठे असून त्यावर जाडजाड शिरा आणि लहान लहान काटे असतात. लागवडीखाली असलेल्या वेलदोड्याचे आकारमानाप्रमाणे लहान व मोठे असे दोन गट पडतात.

हवामान : समुद्रसपाटीपासून ६०० ते १४०० मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये वेलदोड्याची लागवड केली जाते. तथापि समुद्रसपाटीपासून ९०० ते १३७० मीटर उंचीपर्यंतच्या भागात वेलदोड्याची लागवड अधिक यशस्वी ठरते. २५० ते ३८० सें. मी. पर्यंत पडणारा पाऊस तसेच १६ डी. ते ३५ डी. सेंटिग्रेड इतके तापमान वेलडोड्याच्या लागवडीला चांगले ठरते. सतत छायेखाली वाढणारे हे पीक असल्याने वर्षभरात चांगली दाट छाया राहील अशा दाट झाडांची या पिकाला जास्त आवश्यकता असते.

कर्नाटक राज्याच्या पश्चिम घाटापासून त्रावणकोरपर्यंत व कोकण भागात वेलदोड्याची लागवड अगदी जंगलात देखील केलेली आढळते. हसन, कादर, कूर्ग, अन्नमलाई, त्रावणकोरमधील टेकड्यांवर आणि मथुरा भागामध्ये कॉफीच्या मळ्यामधून वेलदोड्याची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते.

जमीन : लालसर (लॅटराईट) खडकापासून बनलेली एक ते दीड मीटर खोलीची, पोयट्याची व चांगला निचरा होणारी जमीन वेलदोड्याच्या लागवडीस योग्य ठरते. सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा असलेल्या आणि जंगलातील झाडपाला कुजून तयार झालेल्या जमिनीत वेलदोडे चांगले येतात. सध्या जेथे वेलदोड घेतात त्या जमिनीची आम्लता ४.५ ते ६.० असते. भरपूर जलधारणाशक्ती असलेल्या जमिनीत या पिकाची जोरदार वाढ होते. वेलदोड्याची लागवड होणाऱ्या सखल जमिनी चांगल्या निचरा होणाऱ्या असाव्या परंतु दलदलीच्या नसाव्या.

वेलदोड्याच्याच्या लागवडीच्या पद्धती:

वेलदोड्याचे कॉफी किंवा चहाप्रमाणे स्वत्रंत्र पीक घेतले जाते. बऱ्याचशा कॉफीच्या मळ्यांमधून चांगल्या निवाऱ्याची स्वत्रंत्र अशी जागा वेलदोड्याच्या लागवडीसाठी राखून ठेवली जाते. कर्नाटक राज्यात मालनाड भागात तसेच दक्षिण महाराष्ट्र राज्याच्या किनाऱ्यावर वेलदोड्याचे पीक दुय्यम पीक म्हणून घेतले जाते. या भागात नैसर्गिकरित्या वाढत असलेली वेलदोड्याची झाडे तशीच वाढू देतात आणि ती लागवड तशीच सोडून दुसरीकडे लागवड करण्यासाठी जागा शोधली जाते. शास्त्रीय दृष्ट्या ही पद्धत बरोबर नाही.

नमुनेदार लागवड : मोठ्या प्रमाणावर घ्यावयाच्या वेलदोड्याच्या मळ्यासाठी डोंगरउतारावर घनदाट अरण्याचा प्रदेश निवडला जातो. वेलदोड्याच्या झाडांना घनदाट छाया लागते. त्यासाठी आवश्यक असणारी योग्य झाडे ठेवून बाकीची झाडे तोडली जातात. वेलदोड्याच्या झाडाची मुळे जंगली झाडांच्या मुळांमध्ये धुसून अन्नांश घेतात. म्हणून दाट जंगल असले तरी त्या पिकाला चालू शकते. तोड केलेल्या जंगलातील झाडांचा पालापाचोळा जमिनीत योग्य प्रमाणात गाडून या पिकास योग्य अशी जमीन तयार केली जाते. ज्या भागात नैसर्गिक जंगल नाही तेथे घनदाट छायेची आणि भरभर वाढणारी झाडे लावणे अत्यावश्यक असते.

वेलदोड्याची लागवड दोन पद्धतीने केली जाते.

१) वेलदोड्याचे बी लावून रोपे तयार करणे व स्थलांतरित पद्धतीने त्यांची लागवड करणे.

२) वेलदोड्याच्या वाढत असलेल्या जमिनीतील गड्ड्याचे ठराविक डोळे ठेवून वेगवेगळे भाग करणे आणि ते भाग लावून लागवड करणे.

पहिल्या पद्धतीत थोड्याशा जमिनीवर मोठमोठ्या मळ्यासाठी भरपूर प्रमाणात रोपे तयार करता येतात आणि लागवड करणे सोपे जाते. त्यामुळे ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरत आहे. वेलदोड्याच्या झाडाची फलधारणा संमिश्र प्रकाराने होते असल्याने ह्या पद्धतीपासून आपल्याला हवी असलेली निश्चित प्रकारची वेलदोड्याची शाए मिळतीलच असे सांगता येत नाही.

दुसऱ्या लागवडीच्या पद्धतीत मात्र आपल्याला हवी असलेली वेलदोड्याची जात मिळू शकते. परंतु फार मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी कंद मिळणे कठीण जाते. ह्या पद्धतीने वेलदोड्याचे सबंध झाड काढून त्यापासून स्वतंत्र गड्डे अलग करावे लागतात. अशा प्रकारे झाडे खणून मोठ्या प्रमाणवर बियाणे काढणे योग्य ठरत नाही. अर्थात ह्या पद्धतीने भरपूर उत्पादन देणाऱ्या बऱ्याचशा कीडप्रतीकारक जाती मिळू शकतात. काही मळ्यांमधून वेलदोड्याची लागवड थोडी पातळ करून चांगल्या जातीचे गड्डे काढून दुसऱ्या लागवडीसाठी नेले जातात. अलीकडच्या काळात केवडा रोगापासून बचाव करण्यास ही पद्धत फारच चांगली ठरते.

रोपे तयार करणे : कर्नाटक राज्यात भरपूर पाणी असणाऱ्या आणि दमट हवामान असणाऱ्या पाणथळ जागेत वेलदोड्याची रोपवाटिका तयार केली आहे. निवडलेल्या जागेत २२ सें. मी. ते ३० सें. मी. उंचीच्या ६० सें. मी. रुंदीच्या सऱ्या पाडल्या जातात. जंगलातील पालापाचोळा कुजून तयार झालेल्या मातीत शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत एकत्र मिसळून ह्या सऱ्या तयार कराव्यात. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. रोप वाढत असताना दीड मीटर उंचीचा मंडप रोपवाटिकेवर केला जातो. पूर्ण वाढ होऊन पक्व झालेली आणि निरोगी व ताजी फळे, रोपे तयार करण्यासाठी निवडती जातात. झाडावरून काढलेली फळे लागलीच फोडून त्यातील बी काढले जाते. फळे एकमेकांना चिकटलेली असल्यास त्यामध्ये राख मिसळून ती हाताने घासावी लागतात व नंतर सावलीत वाळवितात . वेलदोड्यांच्या बियांचा जिवंतपणा अवध्य १५ दिवसापर्यंतच टिकतो. १५ दिवसानंतर उगवणीचे प्रमाण एकदम ५% इतके घटते. त्यामुळे सावलीत बी सुकल्याबरोबर ते लावण्यासाठी वापरले गेले पाहिजे. एक हेक्टरी लागवडीकरता साधारणत: ५०० ग्रॅम बी टाकून हाताने सहजपणे थोडासा दाब द्यावा. नंतर झाडाची वाळलेली पाने विरळ प्रमाणात टाकून सऱ्या झाकाव्यात. रोपांसाठी बियांची लागवड साधारणत: सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये केली जाते. त्याचवेळी पूर्वी लगावलेल्या वेलदोड्याची काढणी झालेली असते. बी टाकल्यावर साधारणत: ३५ ते ४० दिवसांत रुजून वर येते आणि नंतर ४५ दिवसांत वेलदोड्याची रोपे चांगली वाढीला लागलेली दिसू लागतात. चार महिन्यांच्या काळात रोपांची उंची १५ सें. मी. व वर्षभरात ४५ सें. मी. इतकी होते. ४ ते ५ महिन्यांत रोपे स्थलांतरास योग्य होतात. रोपांची योग्य वाढ होण्यासाठी त्याच प्रकारच्या दुसऱ्या वाफ्यामध्ये ४ - ५ महिन्यानंतर २५ सें. मी. उभे, आडवे अंतर ठेवून त्यांचे स्थलांतर करावे. या वाफ्यात लागवडीपूर्वी दर हेक्टरी २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत पसरून द्यावे.

रोपांचे स्थलांतर : निवड केलेल्या जागेत १.५ मी. १.५ मी. किंवा १.८० मी. x १.८० मी. असे आडवे उभे अंतर ठेवून ३० सें. मी. x ३० सें. मी. आकाराचे खड्डे खोदावेत. एक हेक्टर जागेत साधारणत: १००० ते १२५० झाडे बसतात. जंगली झाडांच्या कुजलेल्या पालापाचोळ्यापासून तयार झालेली माती खड्ड्यात टाकून ते भरून काढावेत. पहिला मान्सून पाऊस पडल्याबरोबर लगेच वेलदोड्याची लागवड करावी लागते. म्हणजे एप्रिलपासून जूनपर्यंत वेलदोड्याची लागवड केली जाते. खड्ड्यातील ओलसर मातीत झाडांच्या गड्ड्याच्या सर्वांत वरील वर्तुळावर कंगोऱ्यापर्यंत खोलवर वेलदोड्याची रोपे गाडली जातात. रोप वाऱ्याने इकडेतिकडे पडू नये म्हणून प्रत्येक झाडाला बांबूची एक एक काठी रोवून आधार द्यावा. त्या काठीला वेलदोड्याचे झाड तात्पुरते बांधावे. रोप जोमात वाढीला लागल्यावर काठीचा आधार काढून टाकावा.

आंतरमशागत : खुरपणी आणि खांदणी करणे, जुन्या आणि वाळलेल्या फांद्या तोडणे, आधारासाठी लावलेल्या झाडांची अवास्तव वाढ खुडून काढणे इत्यादी आंतरमशागतीची कामे वेलदोड्याच्या बागेत दरवर्षी करावी लागतात. सुपारीच्या बागेत वेलदोड्याचे पीक घेतले असेल तर सुपारीच्या बागेला होणारी मशागत वेलदोड्याच्या झाडांना पुरेशी ठरते. चांगले कुजलेले लेंडीखत किंवा शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत वेलदोड्याच्या झाडांना घालावे. बऱ्याच वेळा मासळीच्या खताचाही वापर या पिकासाठी केला जाते. करडीची पेंड आणि पोटॅशिअम क्लोराईड या खताच्या माध्यमातून ५० किलो नत्र, २५ ते ३० किलो स्फुरद आणि ६० ते ७० किलो पालाश अशी अन्नद्रव्ये प्रतिहेक्टरी दिली जातात.

कीड व रोग :

१) पाने खाणारी अळी: ह्या आळ्या रात्री झाडाची पाने खातात व दिवसा झाडाच्या सालीच्या आत लपून बसतात. ह्या आळ्यांनी पाने खाल्ल्यामुळे काही दिवसांनी झाडाच्या अगदी काड्या दिसतात.

२) फुलकिडे : हे किडे फळामधील रस शोषून घेतात. त्यामुळे फळे सुरकुततात.

३) खोड आणि फळे पोखरणाऱ्या आळ्या : ह्या आळ्या वेलदोड्याची खोडे आणि फळे पोखरतात. त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान होते. ह्या आळ्या एरंडीचे झाडावर वाढतात. म्हणून एरंडीचे झाडाची वाढ होऊ देऊ नये, अशी काळजी घ्यावी लागते.

कीड, रोगमुक्त वेलदोड्याच्या जोमदार वाढीसाठी उत्पादन सुरू होईपर्यंत पहिले तीन वर्षे खालीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : (जूनमध्ये ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २०० ते २५० ग्रॅम + प्रिझम २०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (जुलैमध्ये ) : जर्मिनेटर ३०० मिली.+ थ्राईवर ३०० मिली. + क्रॉंपशाईनर ३०० मिली.+ प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २०० मिली + प्रोटेक्टंट ३०० ग्रॅम + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (ऑगस्टमध्ये ) : थ्राईवर ३०० मिली.+ क्रॉंपशाईनर ४०० मिली.+ प्रिझम ३०० मिली.+ न्युट्राटोन ३०० मिली + प्रोटेक्टंट ३०० ग्रॅम + १०० लि.पाणी.

३ वर्षानंतर वेलदोडे चालू होण्यासाठी व अधिक उत्पादनासाठी वरीलप्रमाणे फवारणी घेत असताना दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत राईपनर अनुक्रमे ३०० ते ४०० मिलीप्रमाणे वापरावे. बहार अनुक्रमे घ्यावयाचा असल्यास एप्रिलपासून एक - एक महिन्याच्या अंतराने फवारण्या घेतल्या तरी चालते.

काढणी : लागवडीच्या तिसऱ्या वर्षापासून वेलदोड्याच्या झाडाला वेलदोड लागण्यास सुरुवात होते. एप्रिल - मे ते जुलै - ऑगस्ट या काळात वेलदोड्याच्या झाडाल फुले येतात. फुले आल्यापासून वेलदोडे तयार होण्यास ३.५ ते ४ महिने लागतात. ऑगस्ट - सप्टेंबरपासून वेलदोडे काढण्यास सुरुवात होऊन मार्च महिन्यापर्यंत काढणी पूर्ण होते. जमिनीचा मगदूर, वेलदोड्याची जात, झाडाचे आयुष्यमान आणि प्रत्येक हंगामात पडलेल्या पावसावर वेलदोड्याच्या घडातील वेलदोड्यांची संख्या घडांची लांबी, झाडावरील घडांची संख्या आणि एकूण उत्पादन अवलंबून असते. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर वरीलप्रमाणे केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते. ७ वर्षानंतर वेलदोड्याचे झाड भरपूर उत्पादन देते. साधारणत: एका वेलदोड्याच्या झाडाला २० फांद्या फुटतात आणि त्याला १२ घड लागतात. काही वेळा प्रत्येक झाडाला ५५ फांद्या आणि त्यावर ७५ घड येतात. वेलदोडे पूर्ण पक्व व्हायच्या अगोदर घड झाडावरून काढणे अधिक फायद्याचे ठरते. कारण बरेचसे वेलदोडे गळण्याचा तसेच सुरकुतण्याचा संभव असतो. ८ ते १० दिवसांचे अंतराने वेलदोड्याची काढणी केली जाते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून, अधिक प्रयोग करून चांगले निष्कर्ष मिळतील अशी अशा आहे.

उत्पादन : चांगल्या वाढलेल्या वेलदोड्याच्या झाडापासून ९२० ते १४०० ग्रॅम वाळलेले वेलदोडे मिळू शकतात. वेलदोड्याचे उत्पादन हेक्टरी २५० किलो वाळलेल्या स्वरूपात मिळू शकते. अगदीच दुर्लक्षिलेल्या मळ्यातून कमीत कमी १०० ते १५० किलो दर हेक्टरी वेलदोडे मिळू शकतात. अतिशय काळजी घेतली तर वेलदोड्याचे हेक्टरी उत्पादन ७०० किलोपर्यंत सुद्धा मिळते.

प्रक्रिया : विशिष्ट प्रकारचे वेलदोडे तयार करण्यासाठी जुन्या आणि नव्या प्रकारच्या चुल्हाणांचा वापर केला जातो. प्रक्रिया करण्यासाठी बांधलेल्या खोलीच्या आकारमानाप्रमाणे भिंतीच्या कडेकडेने ६० सें. मी. उंचीचे मातीचे कट्टे जरुरीनुसार एका अगर चारही बाजूंनी बांधलेले असतात. चुल्हाण बाहेरच्या बाजूला किंवा चुल्हाणासाठी बांधलेल्या स्वतंत्र खोलीत असते. धूर निघून जाण्यासाठी धुराडे ठेवलेले असते. नैसर्गिकरित्या थोडेसे सुकलेले वेलदोडे कट्ट्यावर पातळ पसरून ठेवले जातात. तयार झालेली उष्णता कट्ट्याखालून फिरत असते. ही प्रक्रिया १२ तास चालू असते. अधूनमधून ह्या वेलदोड्यांना हलवावे लागते. कट्टे बांधण्यापेक्षा खोलीतील जमिनीतून तांब्याचा पाईप नेला तर प्रक्रियेत वेलदोडे सुकविताना त्याचा मूळचा रंग टिकून राहतो. वेलदोड्यांना थोडा तपकिरी रंग आणण्यासाठी वेलदोड्याचे थर जरा दाट घातले जातात. हवा तसा रंग आल्यावर वेलदोडे पोत्यात किंवा खोक्यात पॅक करतात. सूर्याच्या उन्हात वेलदोडे वाळविण्यासाठी २ ते ४ दिवस लागतात. रात्री तसेच वेलदोडे पसरून ठेवले असता त्यावर डाव पडते आणि ते वेलदोडे परत दिवसा उन्हात वळवितात. ह्या वेलदोड्यांना सुद्धा एक प्रकारचा रंग येतो.

महाराष्ट्राच्या काही भागात पांढरे वेलदोडे केले जातात. या पद्धतीत वाळविलेले वेलदोडे साबणाने धुतात आणि एकदोन दिवस सावलीतच सुकवितात. सावलीत असतानाच काही विशिष्ट विहिरीचे पाणी वेलदोड्यावर शिंपडतात. तिसऱ्या दिवशी हेच वेलदोडे परत उन्हात वाळत घालतात. हल्लीच्या काळात एक प्रकारची ब्लीचिंग पावडर वापरत आणली जाते. वेलदोड्याच्या मळ्यामधून गंधकाच्या धुरीची प्रक्रिया करण्याचीसुद्धा पद्धत आहे. ह्या पद्धतीत बांबूची एक उंच मांडणी तयार करतात. ह्या मांडणीला बरेचशे कप्पे असतात. ह्या कप्प्यांमध्ये बांबूच्या टोपलीत वेलदोडे ठेवले जातात. सर्वांत खालच्या कप्प्यात गंधकाच्या धुरीची टोपली ठेवतात. ही क्रिया २ ते ३ तास चालते. विक्रीपूर्वी किंवा पॅक करण्यापूर्वी वेलदोड्याचे देठ आणि बुडखे तोडले जातात. प्रत्येक राजय्त वेलदोड्याच्या वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या आवडीनिवडी असतात. महाराष्ट्रात आणि पश्चिम किनाऱ्यांवरील माणसांना गोल वेलदोडे आवडतात. कलकत्ता व हैद्राबाद भागात लांबट पांढरे वेलदोडे आवडतात.

Related New Articles
more...