सातगाव पठारावर सिताफळ, कांदा पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने जोमदार

श्री. गुलाबराव दुधाजी नवले,
मु.पो. भावडी, ता. आंबेगाव, जि.पुणे.
मोबा. ७३५०९३३११३



आमच्याकडे बाळानगर सिताफळाची भारी काळ्या जमिनीत १५' x १५' वर ३२५ झाडे लावलेली आहेत. जमीन भारी काळी आणि आमचा भाग पठारी (सातगाव पठार) म्हणून ओळखला जातो. येथील ७ - ८ गावात अतिशय अनुकूल हवामान असते. त्यामुळे आमच्या त्या भागात औषध फवारणीचे प्रमाण अतिशय कमी असते. पाऊसमानही चांगले असते, त्यामुळे नुसत्या पावसावरही पिके येतात.

आम्ही या सिताफळाला देखील आता बहार घरताना कोणतीच औषधे फवारली नाहीत किंवा खते दिली नाहीत. बागेची छाटणीदेखील केली नव्हती. भारी काळ्या जमिनीमुळे ५ वर्षाची झाडे १० फुटाहून उंच व घेरही जादा आहे.

यंदा एप्रिल महिन्यात बहार धरलेला माल गणपतीत चालू होता. या बहारापासून २० किलोचे साधारण ६० क्रेट माल निघाला. हा माल श्री. नामदेव रामचंद्र भोसले यांच्या गाळ्यावर (गुलटेकडी, पुणे) विकला. क्रेटमध्ये ५० ते ५४ फळे बसतात. त्याचे वजन २० ते २२ किलो भरते. हा बहार १५ दिवसापुर्वी गौरी गणपतीत (१५ सप्टेंबर २०१४) संपला. एप्रिलचा हा बहार चालू असतानाच मे मधील लेट बहारही धरला. तर त्याची फळे आता चालू झाली आहेत. आज त्याचा वानोळा आणला होता. तर आज दसरा असूनसुद्धा ११० रू./किलो भावाने १ नंबर माल गेला. बाकीचा ५० - ६० रू. किलो भावाने २ व ३ नंबरचा माल गेला. सरांनी सांगितले, 'एरवी दसरा, दिवाळी अशा सणांमध्ये फळांचे भाव ढासळलेले असतात. मात्र यंदा पाऊस जादा झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांची सिताफळे बुरशी लागून काळी पडली, तसेच उत्पादन कमी झाल्याने मार्केटमध्ये आवक कमी असल्याने सध्या दसरा असूनदेखील ११० रू./किलो असा उच्चांकी भाव आपल्याला मिळाला.'

आमच्या भागात गेल्या महिन्यात सतत महिनाभर पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा अजिबात नाही. आता पाऊस उघडून आठवडा झाला आहे, तरी शेतात जाता येत नाही, एवढा चिखल आहे, तशातच ह्या पहिल्या तोड्याचा (वानोळा) काल काढला. मात्र काही फळांवर सततच्या पावसाने काजळी (काळी भुरी) पडल्याचे जाणवत आहे. त्यासाठी सरांनी सांगितले, " थ्राईवर ५०० मिली, क्रॉपशाईनर १ लि. राईपनर १ लि., न्युट्राटोन १ लि., प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम., हार्मोनी ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी करा आणि जर्मिनेटर १ लि. + प्रिझम ५०० मिलीचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा." मात्र जमिनीस वाफसा नसल्याने ड्रेंचिंग करणे शक्य नसल्याचे मी सरांना सांगितल्यावर सरांनी वरील फवारणीमध्येच जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली घेऊन फवारण्यास सांगितले. यानुसार वरील सर्व औषधे आणि जर्मिनेटर १ लि. ३ एकर गरवा कांद्याची रोपे बुडवून लागवड करण्यासाठी घेऊन जात आहे.

आमच्या भागात पंपाने फवारणी शक्यतो कोणी करीत नाही, ट्रॅक्टरवर बॅरलमध्ये औषध तयार करून ट्रॅक्टरने फवारणी केली जाते. फवारणी करणाऱ्याचेच मजूर पाईप (औषधाची नळी) ओढण्यासाठी व फवारण्यासाठी असतात. ते २०० लि. औषधाचे द्रावण फवारण्यासाठी (ट्रॅक्टर, पंप, मजूर सर्व मिळून) ६०० रू. घेतात.

आमच्या पठारी भागात पाऊस जादा होत असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्वांनी १ - १ एकर क्षेत्राला चारही बाजुंनी जेसबीने चर काढून दिले आहेत. आम्ही मागे ५०० 'सिद्धीविनायक' शेवगा लावला होता. मात्र येथे पाऊस जादा असल्याने फुलगळ व्हायची, शेंग लागली तरी ती आपोआप खालून वाळून जायची म्हणून हे पीक काढून टाकले. हे पीक कोरडवाहू, कमी पाण्याच्या भागासाठी वरदान पीक आहे. इतर पिकांना मात्र येथील हवामान उंच पठारी भाग असल्याने फारच अनुकूल आहे. पपईची रोपे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीकडून गेल्यावर्षी नेली होती तर एकही फवारणी न करता पीक चांगले आले. त्याचे पहिले उत्पादन तर घेतलेच शिवाय खोडव्याचेही (दुसऱ्या बहाराचे) उत्पन्न चांगले मिळाले. फवारणी न करता फळ जंबो तयार झाले होते.

यंदा गरवा कांदा ३ एकर लावायचा आहे. कांद्याच्या बियाला व रोपे पुनर्लागवडीच्यावेळी जर्मिनेटरचा मी नेहमी वापर करतो. बीजप्रक्रियेमुळे बियाची १००% उगवण होते आणि मर न होता वाढ लवकर होते. रोपांना तेज व काळोखी कायम राहते. पुनर्लागवडीत रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्याने रोपांची मर तर होत नाहीच पण पांढऱ्या मुळ्यांचा जारवा पुंज क्यासारखा तचार होतो. मुळी पांढरीशुभ्र, रसरशीत कार्यरत राहिल्याने कांद्याची वाढ जोमाने होते. पुढे कोणतीही फवारणी न करता कांदा चांगला पोसून एकरी ९ ते १० टन उत्पादन मिळते.