वाटाण्याची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


वाटाणा ही एक अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी भाजी आहे. वाटाण्याच्या विविध उपयोगांमुळे इतर शेंगाभाज्यांपेक्षा या भाजीस बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून युरोप, रशिया, चीन आणि उत्तर अमेरिकेत त्याची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. उष्ण हवामानातील भागातही हिवाळ्यात आणि समुद्र सपाटीपासून उंच (थंड हवामानात) ठिकाणी त्याची यशस्वीरित्या लागवड केली जाते. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात हे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक असून त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात वाटण्याची लागवड मोठ्या प्रमाणावर पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगार, घुळे, जळगाव, नागपूर, अमरावती, आणि अकोला इत्यादी जिल्ह्यांतून हिवाळी हंगामात होते.

वाटण्यात प्रथिने, कर्बोदके, फॉस्फरस, पोटेशियम मॅग्नेशियम व कॅल्शियम या खनिजांबरोबर 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वेही भरपूर प्रमाणात असतात. ओल्या वाटाण्याचे अनेक रुचकर खाद्यपदार्थसुद्धा तयार करता येतात. वाटाणा हवाबंद करून किंवा गोठवून किंवा सुकवून जास्त काळापर्यंत टिकवून ठेवता येतो. हे पीक द्विदल वर्गात मोडत असल्याने हवेतील नत्र शोषून घेण्याची क्रिया मुळावरील गाठीद्वारे होते. त्यामुळे जमिनीचा कस वाढण्यास मदत होते.

हवामान : थंड हवामान (१० डी. ते १८ डी. सें. पर्यंत) चांगले मानवते. कडाक्याची थंडी, धुके या पिकास मानवत नाही. फुले येण्याचे वेळेल कोरडे, उष्ण हवामान असल्यास शेंगात बी धरत नाही व प्रत कमी होते. या कालवधीमध्ये तापमान वाढल्यान दाण्याची गोडी आणि कोवळेपणा जाऊन ते कडक होऊन पिठूळ लागतात.

जमीन : सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते. हलकी, मध्यम, तांबूस, भुईमूगाला जी जमीन मानवते ती जमीन वाटाणा लागवडी साठी उत्कृष्ट आहे. काळ्या जमिनीमध्ये, चिकनमातीचे प्रमाण जास्त असेल ती जमीन वापरू नये, कारण बियांची उगवण मार खाते व हे पीक मर रोगाला बळी पडते.

हंगाम : वाटणा पिकाची वर्षातून दोन हंगामामध्ये लागवड केली जाते. पहिली लागवड साधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात केली जाते व दुसरी लागवड साधारण दसरा - दिवाळीच्या सुमारास केली जाते.

वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतरच करावे म्हणजे हिवाळ्यात गव्हानंतर उन्हाळी भाजीपाला व त्यांनतर खरीपातील वाटाणा हे पीक घ्यावे. तसेच गव्हानंतर किंवा भातानंतर किंवा खरीपातल्या बाजरीनंतर हिवाळ्यातला वाटाणा करावा. त्याचप्रमाणे वाटाणा हे कीड, रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडणाऱ्या उदा. वांगी, टोमेटो, बटाटा, कांदा अशा पिकानंतर खरीप किंवा रब्बी वाटाणा करू नये. केल्यास कीड, रोगांचे प्रमाण वाढून पीक साधत नाही.

प्रकार आणि सुधारित जाती: वाटाणा हे लिग्युमीनीस कुळातील पीक असून त्याचे गोत्र 'पायसम' आणि 'सटायव्हयम' आहे. महारष्ट्रासाठी खालील वाणांची शिफारस केली आहे.

१) अरकेल : या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे ६ / ७ सेंमी लांबीच्या असतात. झाडांची उंची ३५ ते ४५ सेंमी असून शेंगा लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी काढणीस तयार होतात.

२) बोनव्हला : या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून ४५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.

३) मिटीओर: या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ७/८ सेंमी लांबीच्या असतात. झाडांची उंची ३५ ते ४५ सेंमी असून शेंगा लागवडीनंतर ५० ते ६० दिवसांनी काढणीस तयार होतात. या जातीच्या शेंगातील दाणे गोल गुळगुळीत ही जात लवकर म्हणजे ऑक्टोबरमध्ये लागवडीसाठी योग्य आहे.

४) जवाहर १ : या जातीच्या शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ६ सेंमीपर्यंत लांब असतात. लागवडीपासून ५५ दिवसांत फुलावर येते व ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरुवात होते. शेंगातील दाणे सुरकुतलेले असतात. या जातीची झाडे बुटकी, सरळ वाढणारी असून त्यांची उंची साधारणपणे ८० सेंमी पर्यंत असते.

याशिवाय 'असौजी', 'जवाहर - ४', व्ही.एल. - ३', 'बी. एच. - १' , के.एल. - १३६', बुंदेलखंड आणि 'वाई' इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत.

लागवड : एकरी २० ते २५ किली बियाणे पेरणीस पुरेसे होते. ५०० मिली जर्मिनेटरचा वापर (२५ लि. पाण्यातून २५ किली बियास) बिजप्रक्रियेसाठी केल्यास बियांची उगवण चांगली व लवकर होऊन पुढे १० % खताचा डोस वाचतो. एकरी कल्पतरू सेंद्रिय खत ५० ते ७५ किलो पेरणीच्या वेळेस वापरावे. खत पेरताना बी पेरावे, म्हणजे बी ६ व्या किंवा ७ व्या दिवशी उगवून येईल. पेरताना ९" ते १ फूट अंतरावर पाभरीने पेरावे.

लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वाफ्यावर (६० सेंमी) करतात. सऱ्यांमध्ये दोन्ही बाजूस बी टोकून लावले जाते. टोकन पद्धतीने बी लावल्यास एकरी ८ ते १० किलो बी लागते.

लागवड करताना बियाणे २.५ ते ३.० सेंमी खोलीवर पेरावे आणि जमिनीत पुरेशी ओल असताना लागवड करावी.

पाणी : पेरणी झाल्यानंतर हलक्या जमिनीत पाणी लगेच द्यावे. सतत पाणी देणे टाळावे. शेंगा भरताना नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात भीज पाणी द्यावे. इतर वेळेस भीज पाणी न देता टेक पाणी द्यावे. हलके पाणी द्यावे. वाटाणा वरंब्यावर केला तर टेक पाणी देता येईल. सपाट वाफ्यावर वाटाणा केल्यास थंडीत उन्हाचे पाणी द्यावे. पहाटेचे पाणी देऊ नये, कारण या वेळेस हवेतील आर्दतेमुळे व परत पाणी दिल्यामुळे वाटाणा बुरशी रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

वाटाण्यावर भुरी रोग व मर रोग हे दोन अत्यंत घातक रोग पडतात. तसेच मावा व शेंगा पोखरणारी अळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.

रोग :

१) भूरी : पानाच्या बाजूवर पांढरी पावडरीसारखी बुरशी दिसते. नंतर ती रोपाच्या सर्व हिरव्या भागावर, खोडावर शेंगावर पसरते. त्यामुळे नुकसान होते. शेंग वीतभर झाल्यावर पावसाळी, ढगाळ वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, असे होऊ नये म्हणून प्रथमपासूनच दर आठ दिवसांच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या फवारण्या कराव्यात. यावेळी साप्तामृतात हार्मोनी १॥ ते २ मिली/ लि. पाणी याप्रमाणे मिश्रण करून अशा ३० दिवसात २ वेळा फवारण्या केल्यास बुरशी आटोक्यात येते.

वाटण्याची जी जात गोड असते त्यावर झपाट्याने कीड येते. तेव्हा फवारणीमध्ये प्रोटेक्टंटचे प्रमाण वाढवावे. यामध्ये कार्बारिल (सेविन) घ्यावे. थ्राईवरमुळे फुलकळी, फुलशेंगा गळण्याचे प्रमाण कमी होते आणि ते वाढीस उपयुक्त आहे.

आर्द्रतेच्या ठिकाणी, नाला डोंगरकाठच्या जमिनीमध्ये जेथे बुरशीचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथे विविध फवारण्या करूनही बुरशी आटोक्यात येत नाही. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे व कल्पतरू सेंद्रिय खताचा करावा. रासायनिक खतांचा वापर टाळावा. कारण नत्रयुक्त खतातील नायट्रोजनचे प्रमाण जास्त असेल तर किडी व रोग प्रबळ होतात. म्हणून पोटॅशयुक्त खते, पुर्ण कुजलेले शेणखत, कंपोस्टखत, कल्पतरू सेंद्रिय खत यांचा वापर करावा. कच्चे शेणखत वापरल्यास हुमणीचा प्रादुर्भाव १०० % होतो. वाटाण्याच्या मुळ्या गोड असल्याने नियंत्रण होणे अशक्यप्राय होते.

२) मर रोग : या रोगाचा प्रसार जमिनीतील बुरशीमुळे होतो, रोगट झाडे पिवळी पडून वाळून जातात.

प्रतिबंधक उपाय म्हणून बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटरचा वापर करावा, तसेच नियंत्रणासाठी एकरी जर्मिनेटर १ लि. आणि कॉपर ऑक्झिक्लोराईद १ किलो २०० लि. पाण्यातून मुळावाटे सोडावे.

किडी:

१) मावा : हे हिरव्या रंगाचे बारीक किडे पानातून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज दिसतात. किडींचे प्रमाण वाढल्यास उत्पादन घटते.

उपया : या किडीच्या नियंत्रणासाठी सप्तामृतामध्ये प्रोटेक्टंटचे प्रमाण ३ ते ४ ग्रॅम आणि हार्मोनी १॥ ते २ मिली प्रति लि. पाण्यात घेऊन शेंगा येण्याआधी २ - ३ फवारण्या कराव्यात.

२) शेंगा पोखरणारी अळी : हिरव्या रंगाची अळी प्रथम शेंगांची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास खूप नुकसान होते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ५ ग्रॅम आणि हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणात मिसळून २ - ३ फवारण्या कराव्यात.

वाटण्याचे कीड, रोग, विकृतींपासून संरक्षण तसेच अधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

फवारणी : १) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३०० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० ते १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० ते २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (तोडे चालू झाल्यानंतर दर १० ते १५ दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० ते ७५० मिली. + हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली + २५० ते ३०० लि.पाणी.

काढणी व उत्पादन : वाटाणा ४५ ते ६५ दिवसात काढणीस तयार होतो. शेंगाचा गडद हिरवा रंग बदलून त्या फिक्कट हिरव्या रंगाच्या व टपोऱ्या दिसू लागतात. काढणीयोग्य शेंगा नियमित तोडाव्यात. तोडणी लांबल्यास शेंगा जून होतात. विशेषत: तापमान वाढलेले असल्यास शेंगा जून होण्याची क्रिया झपाट्याने होऊन गुणवत्ता कमी होते. दाणा पांढरट होतो. काढणी ३ ते ४ तोड्यात पूर्ण होते. तोडणीचा हंगाम ३ ते ४ आठवडे चालतो. लवकर येणाऱ्या जातीचे हिरव्या शेंगाचे एकरी उत्पादन १० ते १५ क्विंटल तर मध्यम कालावधी तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन २० ते २५ क्विंटलपर्यंत आणि उशिरा येणाऱ्या जातीचे ३० ते ४० क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळते. शेंगातील दाण्याचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असते. वाटण्याच्या प्रत्येक वाणातील पहिली तोडणी अतिशय चविष्ट, स्वादिष्ट असते. नंतर ती सपक व कमी गोड होते. आठवड्यातून दोनदा तोडणी करणे सोयीस्कर ठरते.

विशेष महत्त्वाचे : वाटाण्यापासून पैसे व्हावेत म्हणून काही शेतकरी फार लवकर उन्हाळ्यात वाटाणा लावतात. पहिल्या २ - ३ तोड्यातच ६० - १०० रू. किलो भाव सापडते. अरकल वाटाणा २ - ३ तोड्यातच संपतो. उत्पन्न कमी असले तरी जादा भावामुळे पैसे होतात.

वाटाणा हे द्विदलवर्गीय शेंगा पीक असून बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटर वापरल्याने व नंतर फवारणी केल्याने झाडांच्या मुळावर नत्रयुक्त गाठी मोठ्या प्रमाणात येतात व त्यामुळे हे पीक पावसाचा ताण सहन करून पहिला रासायनिक खताचा डोस (Basal Dose) वाचतो.

प्रक्रिया उद्योग : वाटाणा हे पीक मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये प्रचलित आहे. ज्यावेळेस वाटाणा मार्केटमध्ये नसतो. त्यावेळेस मॅफको किंवा खाजगी कंपन्यामार्फत वाटाणा सोलून बंद पिशवीत साठवून अशा पिशव्यातून शहरी मार्केटमध्ये उपलब्ध केला जातो. मॅफको वाटाणा साधारणपणे ५०० ग्रॅमची पिशवी १५० ते २०० रुपयांत मिळते. वाळलेल्या वाटाण्याची डाळ, वाटाण्याचे पीठ मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या भागातून हरभरा डाळीपेक्षा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा डाळींबरोबर वाटाणा मिश्र करून या डाळीचे तयार पीठ अनेक नावाने उपलब्ध केले जाते. किंबहुना हरभरा डाळीच्या पीठापेक्षा वाटाणा मीठ उत्कृष्ट आहे. साठवणुकीमध्ये कीड लागू नये म्हणून धुरीकरण किंवा लिंडेनसारखी पावडर वापरली जाते.