प्रायोगीकतेतून किफायतशीर शेतीपुरक उद्योगासाठी 'सिद्धीविनायक' मोरिंगाची निवड व लागवड

श्री. ज्ञानोबा प्रल्हाद दहीफळे,
मु. पो. खोडवा सावरगाव, ता. परळी वैजनाथ, जि. बीड,
मोबा. ८४१२८७२३१९



मी गेल्यावर्षी जून २०१२ मध्ये परळी येथील बाजारात पहाणी करताना शेवगा दिसला. तेथे अनेकांचा माल आला होता. मात्र एका शेतकऱ्याच्या शेवग्याला शेंगा टवटवीत, हिरव्यागार, गरयुक्त असल्याने इतरांपेक्षा भाव ३ - ५ रू./किलोस जादा मिळत होता. म्हणून त्या शेतकऱ्याला हा वाण कोणता आहे असे विचारले. तर तो शेतकरी त्याबद्दल काहीच न सांगता उडवा - उडवीची उत्तरे देत होता. गावही सांगत नव्हता. म्हणून मी त्यांच्यावर लक्ष ठेवून तो शेतकरी ज्या एस. टी. मध्ये बसाल त्याच एस.टी.त मी बसलो व तो उतरलेल्या ठिकाणी मी उतरून त्या गावात गेलो. त्याच्या मागे - मागे जाऊन तो शेतकरी घरात गेल्यावर मी गावातील माणसांकडून त्या शेतकऱ्याबद्दल माहिती काढली. मग मी त्याच्या शेवग्याच्या शेतावर जाऊन शेतात काम करणाऱ्या गड्याला या शेवग्याच्या जातीबद्दल विचारले असता तो म्हणाला हा 'मोरिंगा' शेवगा आहे. पण याचे बी कोठून आणले आहे हे मला माहित नाही. त्यानंतर वर्षभर या बियाच्या शोधात होतो. उस्मानाबाद, लातूर, मुंबई मार्केटमध्ये जाऊन बऱ्याच दुकानात विचारले पण मोरिंगा जातीचे बी कुठे मिळाले नाही.

मागच्या आठवड्यात आमच्या गावातील सोपान वैजुबा दहीफळे ह्यांनी शेवग्याचे बी पुण्याहून आणल्याचे मला समजले. त्यानंतर मी त्यांना विचारले बी कोणत्या जातीचे आहे व कोठून आणले. तर ते म्हणत ते बी मुलाने कोठून आणले क्या माहित नाही. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या उकीरड्यावर मला पिवळी पिशवी (कॅरीबॅग) दिसली. ती पाहिली. त्यावरील फोन नंबर घेऊन फोन लावला. तो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अग्रो) प्रा. लि. पुणे ऑफिसला लागला. फोनवरून त्यांना मी विचारले. आपल्याकडे मोरिंगा शेवग्याचे बी आहे का ? यावर त्यांनी आहे असे सांगितल्यावर आता माझी शोध मोहिम पुर्ण झाली असल्याचे जाणवले. त्यावेळी बियाच्या लागवडी व दरासंदर्भात फोनवर चर्चा केल्यानंतर सविस्तर चर्चा करण्यासाठी, संपूर्ण माहिती घेऊन मोरिंगा शेवगा लागवडीसाठी माझ्यासाठी ६ पाकिटे बी व मित्राला १ पाकिट बी आज (१३ जुलै २०१३ ) घेण्यासाठी आलो आहे.

माझ्याकडे एकूण १२ एकर जमीन आहे. ३ एकर एका जागेवर तर बाकीची थोडी - थोडी विभागून गावातच १ किमी अंतरामध्ये आहे. यामध्ये दरवर्षी कापूस, सोयाबीन (महाबीज - ७१ नंबर) आणि हायब्रीड (महाबीज २९६) करतो.

कापूस ४ फुटाच्या ओळीत १ ते १। फुटावर लागवड असते. याची कोरडीलाच पेरणी करतो. पाऊसकाळ चांगला असला तर २ महिन्यात फुलपात्या लागून दिवाळीत वेचणी सुरू होते. ३ वेचण्यात संपूर्ण कापूस वेचला जातो. कोरडवाहूचे गेल्यावर्षी ४५० ग्रॅम बियापासून ५ क्विंटल उतार मिळाला तर बागायतीमध्ये ८ क्विटंल उतारा मिळाला. २ एकरात ५ बॅगा पेरला होता तर एकून ३५ क्विंटल ७० किलो कापूस झाला. याल शेणखत डी.ए.पी. युरीया ३ वेळा दिला.

हायब्रीड महाबीज २९६ च्या बॅगा पेरल्या होत्या हायब्रीडचे एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळून ७०० कडबा होतो. सोयाबीन महाबीज ७१ नंबर करतो. बियाणे महाबीजचे १७०० रू. ने (३० किलो बॅग) आम्हला मिळते व आमच्याकडून नंतर त्याचे आलेले उत्पादन बियासाठी १६४० रू. ने तेच परत घेतात नंतर ते त्यावर प्रक्रिया करून मार्केटमध्ये २५०० रू./बॅग प्रमाणे बी विकतात. आम्हाला खते. औषधे महाबीजच पुरवते व नंतर उत्पादन आल्यावर मालातून पैसे वजा करतात. आपल्याकडून घेतलेले बियाण्याचे मे ते जुलैपर्यंत ३ हप्त्यात पैसे देतात.

कोंबड्याच्या विष्टेवर मासेपालन

या शेतीबरोबर मासे पालन, कोंबडीपालन व्यवसाय आहे.१५० गावराण कोंबड्या आहेत. त्या दिवसभर मोकाट रानात चरतात. ३० फूट लांब, २० फूट रुंद आणि २६ फूट खोलीची विहीर मशीनने खोदली आहे. त्याला २५ हजार रू. खर्च आला. यामध्ये ३००० मासे बी सोडले आहेत. मासे बियाचे ३०० रू. ला पाकिट असते. विहीरीच्या वरून बारीक जाळी टाकली आहे. त्यावर रात्री कोंबड्या बसतात. विहिरीच्या बाजूने देखील जाळीचे बंदिस्त कंपाऊड केले असून वरून पत्र्याचे शेड केले आहे. जाळी कोंबड्यांचे पाय अडकणार नाही अशी बारीक आहे. या कोंबड्या दिवसा रानात फिरतात. रात्री जाळीवर बसतात.

त्यांची विष्टा विहिरीत पडते. ती मासे खातात. याशिवाय मास्यांना व कोंबड्यांना शेंगदाणा खापरी पेंड आणि हायब्रीड भरडून गरजेप्रमाणे देतो.

विहिरीतील पाणी किमान ३ दिवसांनी तरी बदलावे लागते. अन्यथा दुषीतपणा वाढून मासे मरू शकतात. म्हणून त्यासाठी रानात १५०० फूट अंतरावर बोअर आहे. तेथे १।। एच. पी. मोटर बसवून ते पाणी विहिरीत सोडतो आणि विहिरीतील पाणी ७।। एच.पी.च्या मोटरने (२।। इंची पाईप लाईन) ३ एकर शेताला देतो. म्हणजे कोंबड्यांची विष्टा मास्यांचे अन्न बनते. शिवाय मास्यांच्या विष्टेचे व कोंबड्यांच्या विष्टेचे विहिरीतील खतयुक्त पाणी शेतीला वापरले जाते. असे एकास एक पुरक व्यवसाय आहे.

एकाचवेळी कमी खर्चात कोंबडी व मत्स्यपालन यशस्वी

मासे बी विहीरीत सोडल्यानंतर ३ महिन्यांनी मासे विक्रीस काढतो. एका मास्याचे वजन ३ ते ३।। किलो भरते. व्यापारी विहीरीवर येऊन जिवंत मासे ५० ते ६० रू./किलो दराने नेतात. मासा वांबट प्रकारातील आहे।

गावरान कोंबड्यांमध्ये १४० कोंबड्या व १० कोंबडे आहेत. दररोज किमान ९० -१०० अंडी मिळतात. गावरान (देशी) १ अंडे ५ रू. ला सिझनमध्ये जाते. तर उन्हाळ्यात ३.५० रू ने जाते.

कोंबड्या बसवून अंडी उबविली जातात. गिऱ्हाईक असेल तसे पिल्ले, तलंगा आणि कोंबड्यांचीही विक्री चालूच असते.

ह्या कोंबड्यांना उन्हाळ्यात रानात सावली राहत नसल्याने उन्हाळे लाहा - लाहा करतात. खास त्यांच्यासाठी हा 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावायचा आहे. याचा उद्देश असा की, शेवग्यापासून उत्पादन तर मिळेलच शिवाय उन्हाळ्यात याच्या सावलीत गाराव्याला दिवसभर कोंबड्या राहतील व चरतील.

असे पुर्ण नियोजनबुद्ध शेती व शेतीपुरक व्यवसाय करत असून मी एकटाच हे सर्व सांभाळत असतो. गरजेप्रमाणेच मजूर लावतो. मला २ मुले व २ मुली आहेत. चांगले शिक्षण मिळण्यासाठी चारही मुले अहमदपूरला (जि. लातूर) ठेवली आहेत. खोली भाड्याने घेऊन माझी पत्नीही तेथेच त्यांच्या स्वयंपाकासाठी आहे. मोठी मुलगी १३ वीला, मुलगा १० वी ला, दुसरी मुलगी ४ थी ला तर बारका मुलगा ३ री ला आहे. शिक्षणाचा खर्च एका मुलाला ३० हजार रू. वर्षाला येतो. हा सर्व खर्च शेती व्यवसायातून भागवून नव - नवीन प्रयोग व व्यवसायाच्या शोधात असतो.