सुर्यफुलावरील किडीचे व्यवस्थापन

श्री. एस. टी. शिंदे, डॉ. डी. डब्ल्यू, वाडनेरकर, डॉ. बी. बी. भोसले व श्री. बी. व्ही. भेदे
कीटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी


सूर्यफुल हे आपल्या भागातील महत्त्वाचे तेलबिया पीक असून खरीप हंगामात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. सूर्यफुल या पिकावर महाराष्ट्रात सुमारे ३४ किडींचे नोंद झालेली आहे. यापैकी तुडतुडे, केसाळ अळी, घाटे अळी, उंट अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, खोडकिडा, पांढरी माशी, इत्यादींचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या अवस्थेत दिसून येतो. तेव्हा सदर लेखात सूर्यफुल पिकावरील महत्त्वाच्या किडी कशा ओळखायच्या व त्यांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावयाचे याबद्दल मार्गदर्शन करावयाचा प्रयत्न केला आहे.

१) तुडतुडे : पानाच्या खालच्या बाजूस असतात. त्यांचा आकार पाचरीसारखा असून रंग फिकट हिरवा असतो. ते पानातील रस शोषण करतात. यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने कोकडतात.

२) पांढरी माशी : पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषण करीत असल्याने झाडांचा जोम कमी होतो. ही कीड शरीरावाटे पानांवर चिकटगोड पदार्थ उत्सर्जित करते त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते व वाढ खुंटते.

३) केसाळ अळी : पूर्ण वाढ झालेली केसाळ अळी २.५ ते ३ सेमी लांब असून तिच्या शरीरावर लांब केसाचे अनेक झुपके असतात. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानातील हिरवा भाग कुरतडून खातात म्हणून पाने जाळीदार दिसतात. मोठ्या अळ्या शेतभर पसरतात.

४) घाटे अळी : पतंग मजबूत बांध्याचे असून रंग फिक्कट बदामी असतो. अळ्या फुले येण्याआधी सूर्यफुलाची कोवळी पाने खातात. फुले उमलल्यानंतर अळ्या फुलातील बिजांडकोष खातात.

५) तंबाखूची पाने खाणारी अळी : या किडीला शास्त्रीय भाषेत स्पोडोप्टेरा लिटुरा या नावाने ओळखतात. किडीचा पतंग मजबूत बांध्याचा २२ मि.मी. लांब असून त्याचा पंख विस्तार ४० मि.मी. असतो. पुढील पंख सोनेरी व करड्या तांबड्या रंगाचे असून त्यावर नागमोडी पांढऱ्या खूणा असतात. मागील पंख पांढरे असून कडेला तांबडी झालर असते. लहान अळी पांढुरकी हिरवी व थोडीशी पारदर्शक दिसते. पुर्ण वाढलेली अळी ५० मि.मी. लांब आणि वेगवेगळ्या रंगाची असते. त्यामध्ये जास्तीत - जास्त पिकावर ती काळपट रंगाची ते पांढऱ्या रंगाची असून तिच्या पाठीवर काळे ठिपके व रेषा तर शरीराचे बाजुवर पांढरे चट्टे दिसून येतात. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत कोषवस्थेत जाते. कोष काळपट लाल रंगाचा दिसतो. तर अंडी पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याने आढळून येतात व ती शरीराच्या केसांनी आच्छादलेली असतात. या किडीची मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूने पुंजक्यानी अंडी घालतो. एका अंडी पुंजामध्ये सहसा ८० - १०० अंडी असतात. एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यात ३०० ते ४०० अंडी घालते. अंडी अवस्था ३ ते ४ दिवस तर अळी अवस्था २१ - २२ दिवस असते. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९ -१० दिवस असते. प्रौढावस्था जवळ - जवळ ६ - ७ दिवसांची असते. मादी प्रौढ कोषातून बाहेर येताच पानाच्या खाली अंडी घालणे सुरू करतात. एक पिढी पुर्ण होण्यास साधारणपणे ३२ ते ६० दिवस लागतात. पिकांवर असताना ही पिढी साधारणपणे ३५ ते ४० दिवसात पुर्ण होते. या किडीने पुंजक्यात घातलेल्या अंड्यामधून लहान लहान अळ्या समूहात बाहेर पडतात व प्रथमत: त्याचे पानातील हरीतद्रव्य मागील बाजूने राहून खातात. त्यामुळे पाने जाळीदार व कागदी होऊन पांढरी होतात. त्यावर किडीच्या विष्टेचे कण सुद्धा दिसतात. अशा प्रकारचे नुकसान इतरत्र आढळते. ह्याच अळ्या नंतर मोठ्या होऊन स्वतंत्रपणे पाने तसेच कोवळे शेंडे, फुले व पिकांचे नुकसान करतात. ही अत्यंत खादाड कीड असल्यामुळे संख्या वाढताच अतोनात नुकसान करताना दिसून येते.

व्यवस्थापन :

१) प्रादुर्भावग्रस्त शेताची उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.

२) पिकांची योग्य फेरपालट करावी.

३) शिफारस केलेलीच नत्राची मात्रा द्यावी.

४) शेत तसेच बांध स्वच्छ ठेवावेत व ५% निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

५) केसाळ अळी व स्पोडोप्टेरा या किडींची अंडीपुंज असलेली पाने तसेच जाळीदार पाने व त्यावरील अळ्यासह गोळा करून त्यांचा नाश करावा.

६) प्रकाश सापळ्यांचा रात्री ७ ते १० च्या दरम्यान वापर करून पकडलेल्या पतंगाचा नाश करावा.

७) घाटे अळी व तंबाखूवरील अळींच्या व्यास्थापनासाठी हेक्टरी ८ ते १० कामगंध सापळे लावावेत.

८) सुर्यफूलावरील खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी उगवणीनंतर २५ व ४० दिवसांनी ०.०५ टक्के क्विनॉलफॉस (२५ ईसी) किंवा ०.०५% क्लोरपायरीफॉस (२० ईसी) या किटकनाशकांच्या दोन फवारण्या कराव्यात.

९) सुर्यफूलावरील पिठ्या ढेकूण या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी डायक्लोरोव्हॉस ७६% डब्ल्यू. एस्सी, २० मिली किंवा मिथोमिल ४० एस.पी. १० ग्रॅम अधिक २० ग्रॅम साबणाचा चुरा प्रति १० लि. पाण्यात मिसळून किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच फवारणी करावी. गरजेनुसार दुसरी फवारणी करावी.

१०) तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच बॅसिलस थुरीनजीएन्सीसची पाण्यात विरघळणारी भुकटी १ ते १।। किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात किंवा एस. एल. एन. पी. व्ही. विषाणू ५०० लिटर पाण्यात किंवा एच. ए. एन. पी. व्ही. विषाणू २५० एल. ई./हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी.

१२) रासायनिक किटकनाशकाचा वापर किडी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडत असल्यासच करावा.

कीड   किटकनाशक        मात्रा/१० लिटर पाणी  
फुलकिडे पांढरी, माशी   ईमिडेक्लोप्रीड १७.८% किंवा     
अॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम     
५ मिली
२० मिली  
घाटेअळी/स्पोडोप्टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी)   क्विनॉलफॉस २५ ई.सी. किंवा          
क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. किंवा
इमॅक्टीन बेन्झोटीक ५ ग्रॅम किंवा
स्पिनोसॉड ५ एस.जी. किंवा
इनडायक्झाकार्ब १४.५ एस.सी.किंवा     
मिथोमिल ४० एस.पी. किंवा
थायोडीकार्ब ७५ एस.पी. किंवा
फोसॅलोन ३५% प्रवाही किंवा
कार्बारिल १०% भुकटी
२० मिली
२० मिली
४ ग्रॅम
४ ग्रॅम
१० मिली
२० मिली
१५ मिली
१४ मिली
२० ग्रॅम  
तुडतुडे   मॅलेथिऑन ५% भुकटी किंवा
मिथिल पॅराथिऑन २% भुकटी
क्विनॉलफॉस १.५ % भुकटी किंवा
फोसॅलोन ४% भुकटी  
२० ग्रॅम
२० ग्रॅम
२० ग्रॅम
२० ग्रॅम  
खोडकिडा   क्विनॉलफॉस २५ % प्रवाही   २० मिली