दुर्वा (Cynidon Dactylon)

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


दुर्वा: कषाया:मधुराश्र्चशीता: पित्ततृष्ण रोचक वान्ति ह्या: ! सदाह मूर्च्छा ग्रहभूत शान्तिश्लेष्मश्रमध्वं सनतृप्तिदाश्च।।

अर्थ असा कि दुर्वा चवीला साधारण तूरट, शीतल, मधूर, तृप्तीकारक व तृषा, वांती, दाह, रक्तदोष, श्रम, कफ, मुर्च्छा, अरुचि, विसर्प, भूतबाधा याचा नाश करते. अशा औषधी गुणधर्म असलेल्या दुर्वाची ओळख प्रत्येकास गणपती पूजनानिमित्त आहेच. दुर्वा वाहिल्याशिवाय गणपतीची पुजा पूर्णच होत नाही. या गडद हिरव्या दुर्वा म्हणजे समुद्र मंथाच्या वेळी मंदार पर्वताच्या घर्षणामुळे भगवान विष्णूचे गळून पडलेले केस. समुद्राच्या पाण्याच्या लाटांबरोबर हे केस वाहत वाहत काठाला लागले. मातीत रुजले तेच दुर्वा. देव व दानव अमृत कुंभासाठी पळापळी करत असताना अमृताचे काही थेंब त्यावर पडले. त्यामुळे दुर्वा चिरंजीवी झाल्या. दुर्वाच्या रसाचा खास गुण म्हणजे तो अतिशय थंड असतो. ह्या थंड गुणधर्मामुळेच गणपतीशी दुर्वांचा अखंड स्नेह जुळला. त्याची कथा अशी सांगितली जाते की पूर्वी अनलासूर नावाचा राक्षस होता. त्याच्या तोंडातून व डोळ्यातून आग निघत होती. त्याने पृथ्वीवर धुमाकुळ घातला तेव्हा गपणतीने बलरूप धारण करून त्याच्याशी युद्ध आरंभले, परंतु अनलासुर जुमानत नव्हता तेव्हा गणपतीने विराट रूप धारण करून राक्षसास गिळले, मात्र त्याच्यातील आगीमुळे गजाननाच्या कंबरेला शंकराने सर्प बांधला (कारण तो थंड असतो), चंद्र प्रत्यक्ष भाळी बसले, वरुणाने अभिषेक केला. तरी दाह शांत होईना तेव्हा एकवीस ऋषीने प्रत्येकी २१ दुर्वा असलेल्या जुड्या वाहिल्या. तेव्हा गणपतीस शितल वाटू लागले. तेव्हा प्रसन्न होऊन गणपतीने सांगितले की जो मज २१ दुर्वा वाहिला त्याच्या मनोकामना पूर्ण होतील, ही गोष्ट सर्वांना माहीत आहेच पण दुर्वांचे औषधी गुणधर्म जे सर्वांना माहीत व्हावे यासाठी हा लेख वाचकांसाठी देत आहोत.

दुर्वा एक प्रकारचे गवत आहे. त्यास हरळी म्हणतात. हरळीचे पुढली तीन पाने असतात त्यास दुर्वा म्हणतात. रंग पाचूसारखा हिरवा. या गवताचा विलक्षण गुण म्हणजे कितीही दुष्काळ पडला, इतर वनस्पती सुकल्या तरी दुर्वांची मुळे ओलसर असतात. घोड्यांना व सशांना हे गवत फार आवडते. दुर्वाच्या दोन जाती आहेत. एक श्वेत दुर्वा व दुसरी नील दुर्वा. म्हणजे पांढरी व निळी ह्या दोन्ही दुर्वा औषधासाठी उपयोगात आणतात.

दुर्वा अतिशय थंड असतात. घोळणा फुटून नाकातून रक्त येत असल्यास दुर्वाचा रस व खडीसाखर एकत्र करून दिल्यास रक्त येणे थांबते. विषमज्वरातील ताप ज्यावेळी वाढतो, अंगाची अतिशय आग होते त्यावेळी दुर्वांचा रस हे अमृत समान औषध आहे. लघवीला होत नसेल, थेंब थेंब होत असेल, लघवीचा तांबडा रंग, गढुळपणा असेल त्यावर दुर्वांचा रस दिल्याने लघवीचे सर्व विकार बरे होतात. अतिसार, रक्तातिसार दुर्वारसाने बरे होतात, आगीजवळ काम करणारे तसेच गॅसजवळ सतत काम करणाऱ्या गृहिणी ह्यांनी आगीची उष्णता व त्यामुळे येणाऱ्या घामाने जे त्वचारोग होतात म्हणजे खाज सुटणे, चकंदळे पडणे, त्यावरही दुर्वांचा रस उपयोगी आहे. दुर्वा व तांदुळ समभाग एकत्र वाटून त्याचा जाड लेप करून लावल्यास मस्तकातील उष्णता कमी होते. आगपैणी आणि धावऱ्यावर दुर्वांचा वाटून लेप लावावा.

श्वेत दुर्वा : मधूर, रुचिकर, तुरट, कडू, शितल, व वांती विसर्प, तृषा, कफ, पित्त, दाह, अतिसार, आमतिसार, रक्तपित्त व खोकला ह्याचा नाश करते.

नीलदुर्वा : अतिमधूर, कडू, शितल, संजीवन रक्तशुद्धीसाठी उपयोगी आहे. रक्तपित्त, अतिसार, ज्वरपित्त, वांती, कफ, रक्तरोग, तृषा, चर्मरोग ह्याचा नाश करते.

उचकीवर दुर्वांचा रस १ मासा आणि मध एक तोळा एकत्र करून घ्यावा. दुर्वांच्या मुळ्या, पांढरा कात, उंबराच्या पानावरील फोड एकत्र वाटून लावले असता आगपैणी बरी होते.

काही मुलींना वयात येऊनही ऋतुप्राप्ती होत नाही. त्यासाठी पांढऱ्या दुर्वांच्या रसात डाळींबीचे मोठमोठे दाणे वाटून तो रस शिळ्या पेजेतून सात दिवस दिल्यास ऋतुप्राप्त होते. ज्यांना मासिक पाळीचा अनियमितपणा असेल त्यावर पांढऱ्या दुर्वांचा रस उपयोगी पडतो. सर्व प्रकारच्या तापावर दुर्वांचे मुळ मनगटावर बांधले अस्ताला ताप कमी होतो. विंचू दंशाच्या दाहावर, फेफरे, फिटस, आमांश, ओकारी, खोकला यावर दुर्वाचा रस गुणकारी आहे. दुर्वामुळे वंध्यत्व नष्ट होते. गरोदर स्त्रीयांनी उजव्या नाकपुडीत दुर्वाच्या रसाचा थेंब टाकल्यास होणारे बाळ सुदृढ होते. संध्याकाळी अनवाणी दुर्वाच्या हिरवळीवरून १० ते १५ मिनिटे चालल्यास अंगातील कडकी निघून जाते. मन प्रसन्न होते. शिवाय दृष्टी सुधारते. दुर्वा अत्यंत पवित्र, प्रजोत्पादक, आयुष्यवर्धक, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे आपल्या पुर्वजांना माहीत असावे म्हणूंन गणपती पुजनात दुर्वाचे महत्त्व दिले. दुर्वा केवळ गवत नसून एक औषधी वनस्पती आहे. म्हणून प्रत्येक्ष गजाननाने त्याचा स्विकार केलेला आहे.