टॉंपिओका (साबुकंद) एक उपयुक्त पीक

टॅपिओका म्हणजेच 'शेवरकंद' किंवा 'साबुकंद' हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. विविध भागात शेवरकंदाल विविध नावाने ओळखले जाते. टॅपिओकाचे शास्त्रीय नाव 'Manihot Esculenta Crantz' हे आहे. टॅपिओकाचे कंदाचे विविध खाद्यपदार्थ घरगुती मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. दुसरा अतिशय महत्त्वाचा उपयोग म्हणजे टॅपिओका कंदावर प्रक्रिया करून स्टार्च तयार करतात आणि स्टार्चपासून साबुदाणा, नयलॉन पोहे, ग्लुकोज व अल्कोहोल तसेच इंधनातही त्याचा उपयोग करता येतो.

वरील उपयोगांव्यतिरिक्ट टॅपिओकाच्या कंदापासून ताजा रस, सायरप, उत्तम पेये, स्टार्चपासून विविध पदार्थ औषधे, वस्त्रनिर्मिती, पेपर, प्लायवूड, पेंट, पेस्ट, बॅटरी, बेकरीतील पदार्थ असे अनेक प्रकरे टॅपिओकाचे उपयोग होतात.

हवामान व जमीन : टॅपिओका उष्ण व दमट हवामानातील पीक आहे. टॅपिओकाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर पाऊस व सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. अतिशय कडक हिवाळा किंवा हिमवर्षाव या पिकला मानवत नाही. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी २९ ते ३५ डी. सें. तापमान लागते.

टॅपिओकाच्या लागवडीसाठी उत्तम निचर्‍याची, मध्यम ते भारी सुपीक आणि ५.५ त ७.० सामू असलेल्या जमिनीचीच निवड करावी. अतिभारी किंवा खडकाळ जमिनी या पिकासाठी योग्य नसतात.

टॅपिओकाची लागवड : या पिकाची लागवड करण्यापूर्वी नांगरणी, ढेकळे फोडणी, वखरणी, फणणी, कुळवणी, शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणे इत्यादी प्रकारची कामे करून जमीन तयार करावी. टॅपिओकाची तीन प्रकारे लागवड करता येते.

१) चारी पद्धत , २) वरंबा पद्धत व ३) सारी पद्धत.

यापैकी चारी पद्धत सर्वात जास्त उत्पादन देणारी आहे टॅपिओकाची लागवड करण्यापूर्वी वाणांनुसार खड्डे खोदून घ्यावेत, जसे विस्तारित वाणाची ९० x ९० सें.मी. व कमी विस्तारीत वाणाची ७५ x ७५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. महाराष्ट्रात टॅपिओकाची लागवड जून -जुलै महिन्यात केली जाते.

टॅपिओकाची लागवड खोडाच्या छाटांपासून करतात. लागवडीकरिता २ ते ४ सें.मी. जाडीचे पक्क झालेले खोड निवडावे. लागणीच्या वेळीच खोडांचे २० ते ३० सें.मी. लांबीचे तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्यावर ४ ते ६ वाढीचे डोळे असावेत.

टॅपिओकाची लवकर अभिवृद्धी करण्याची सुधारित व सोपी पद्धत कॉली कोलंबियन येथील सेंट्रल ट्यूबवर क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट व सी. आय. ए. टी. संस्थांनी विकसित केली आहे. या अभिवृद्धी पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

पक्क लाकडी खोडाचे दोन पेरगाठी (Nodes) असलेले तुकडे कापून तयार करावेत.

त्यानंतर १.२ x ५ वाफ्यातील माती निर्जंतुक करावी व जमिनीत १ सें.मी. खोलीवर छाट - क्षितीज समांतर लावावेत. सर्व वाफ्यांना सावलीसाठी पॉलिथीन शीटचे पारदर्शक छप्पर करावे.

लावणीनंतर ३ आठवड्यांनी बेण्यापासून ८ सें.मी. किंवा अधिक लांब अंकूर वाढल्यानंतर, हे अंकूर धारदार रेझरच्या पात्याने पेरगाठीच्या खाली १ सें.मी. खुंट कायम ठेवून कापून काढावीत. अशाप्रकारे ३ ते ४ दिवसांच्या अंतराने ८ सें.मी. लांब अंकूर कापून काढता येतात.

कापलेला कोवळा एकेक अंकूर मुळे फुटण्यासाठी पाण्याने भरलेल्या काचेच्या बाटलीत ठेवावा व या बाटल्या पॉलिथीनच्या छपराच्या सावलीत ठेवाव्यात.

बाटलीतील अंकुरांना एक ते दोन आठवड्यांत मुळ्या फुटतात. मुळ्या फुटलेला अंकूर काढून शेतात लावतात.

टॅपिओकाच्या कांड्या शेतात लावण्यापुर्वी १० लि. पाण्यामध्ये १०० मिली जर्मिनेटर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंटच्या द्रावणात टॅपिओकाच्या कांड्या १० मिनिटे बुडवून ठेवून नंतर लागवडीसाठी त्यांचा उपयोग करावा.

टॅपिओकाची शेतात लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून, भुसभुशीत तयार झाल्यानंतर ९० सें.मी. अंतरावार सर्‍या काढाव्या. नंतर जमीन भिजवून घ्यावी व थोडा वाफसा आल्यानंतर १ x १ मीटरवर लागवड करावी. लागवड करतान बेण्यांवरील डोळ्यांची दिशा आकाशाकडे ठेवावी व बेणे काड्या उभ्या लावाव्या. जमिनीच्या पृष्ठभागावर बेण्याचे २ किंवा ३ डोळे ठेवावेत. लागवडीनंतर बेण्यांभोवती हलकीशी माती दाबावी.

टॅपिओकाच्या सुधारित जाती: टॅपिओकाच्या लागवडीसाठी उत्तम गुणवत्तेच्या सुधारित जातींचीच निवड करावी. टॅपिओकाचे प्रामुख्याने कडू व गोड असे दोन प्रकार आहेत. टॅपिओकाच्या प्रामुख्याने कडू व गोड असे दोन प्रकार आहेत. टॅपिओकाच्या पिकाच्या आंतरसालीत हायड्रोसायानिक आम्ल असल्याने कडून चव लागते, तर पिष्टमय भागात आम्ल नसल्याने कडवटपणा नसतो.

टॅपिओकाच्या खालील सुधारित जाती भारतात घेतल्या जातात.

१) एम - ४ : केरळ राज्यात घेतली जाणारी, गोड कंद असलेली व प्रती हेक्टरी २० ते २५ टन कंदाचे उत्पादन देणारी जात.

२) कालीकफलन : उत्तम प्रतिचे कंद असलेली, हलक्या जमिनीस उपयुक्त पण मोझाईक रोगाला बळी पडणारी जाते आहे.

३) कारूथाकालीयम : गोड कंद असलेली, दहा महिन्यांच्या कालावधीत तयार होणारी व हेक्टरी ३२ टन कंद देणारी जात.

४) एच -९७ : ओलसर कंदामध्ये २५ ते २९ टक्के स्टार्चचे प्रमाण असणारी, १० महिन्यांत तयार होणारी व प्रती हेक्टरी २५ ते ३५ टन ताजे कंद मिळवून देणारी संकरित जात.

५) एच - १६५ : २३ ते २५ टक्के स्टार्च असणारी ८ ते ९ महिन्यांत तयार होणारी व ३३ ते ३८ टन कंदाचे उत्पादन देणारी जात. ही जात मोझाईक रोगास प्रतिकारक आहे.

याशिवाय टॅपिओकाच्या एच - २२६, एच - १६८७ (श्री विशाखाम), एच -२३०४ (श्रीसाह्य),एस-८५६ (श्रीप्रकाश ) , एच ३१२, एच -३६४१, सीएल -६४९, सीएल -६६४, एच -११९, सी- ५६०, एच -१६५ इत्यादी अनेक सुधारित जाती उपलब्ध आहेत.

आंतरमशागत : टॅपिओकाच्या लागवडीनंतर अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टॅपिओकाची लागवड केल्यानंतर लगेच 'तुट आळी भरणी' करून घ्यावी. शेतात लावणी केलेल्या बेण्यांना अंकूर फुटल्यापासून १० ते १५ दिवसांनी अंकूराची विरळणी करावी व एका बेण्यावर परस्परविरुद्ध किंवा एकासमोर एक असे केवळ दोनच फुटवे ठेवून बाकीचे फुटवे काढून टाकावेत. टॅपिओकाच्या सुरुवातीच्या काळात आंतरमशागतीच्या कामामध्ये खुरपणी करून प्लॉट तणविरहित स्वच्छ ठेवणे, तसेच जमीन भुसभुशीत करून खोडांना भर घालणे, हवा खेळती राहण्यासाठी माती भुसभुशीत ठेवणे, पाणी साठून राहत असेल तर चार काढून देणे, रोगराई व किडींचे अस्तित्व जाणवल्यास त्यांचा प्रतिबंध करणे इत्यादी कामे वेळोवेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टॅपिओकाची लागवड केल्यानंतर २० ते २५ दिवसांनी पहिली खुरपणी करवी व त्यानंतर पुन्हा २० -२५ दिवसांनी दुसरी खुरपणी करावी. तसेच पहिली भर लागवडीनंतर ३० दिवसांनी तर दुसरी भर लागवडीनंतर ६० दिवसांनी द्यावी.

खते : खतांचा समतोल वापर टॅपिओका लागवडीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण टॅपिओका हे कंदवर्गीय बारमाही पीक आहे. टॅपिओकाच्या झाडांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि जमिनीतील पोसणार्‍या कंदांचे भरपूर उत्पादनासाठी अन्नद्रव्यांचे प्रमाण त्या जमिनीत भरपूर प्रमाणात असणे गरजेचे आहे. समतोल खतांच्या वापराने झाडांची उत्पादनक्षमता तर वाढीस लागतेच, परंतु त्या झाडांची उत्पादनक्षमता तर वाढीस लागतेच, परंतु त्या झाडांची वाढही झपाट्याने होते. टॅपिओकाला अनेक अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात लागतात. उदा. कार्बन, प्राणवायू, हायड्रोजन, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मंगल, तांबे, जस्त, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन इत्यादी. यापैकी कर्ब, प्राणवायू, हायड्रोजन हे हवेद्वारे मिळते, तर बाकीची अन्नद्रव्ये जमिनीतून व विविध खतांच्या माध्यमातून मिळतात. टॅपिओकाची लागवड सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणी प्रामुख्याने केली जाते व तेथे भरपूर उत्पादनदेखील मिळविले जाते.

टॅपिओकाला द्यावी लागणारी खतांची मात्र ही जातींवर अवलंबून आहे.

टॅपिओका जात  
संपूर्ण मात्रा
(कि.ग्रॅ./हे.)
       न.        स्फु.        पा.
एच - १६५ व एच -९७  
       १००          १००        १००
एच - २२६ 
       ७५          ७५        ७५
एम -४  
       ५०          ५०        ५०
रासायनिक खते विभागून हप्त्याहप्त्याने देणे फायदेशीर ठरते. परंतु त्याहीपेक्षा कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करणे फार फायदेशीर ठरते. त्याने जमीन सतात भुसभुशीत ठेवली जाऊन कांदांचे पोषण होण्यासाठी वाफसा अवस्था कायम ठेवता येते. झाडाच्या भोवती गोलाकार चार काढून खते द्यावीत व त्वरित मातीने झाकून पाणी द्यावे. टॅपिओकाच्या काही सुधारित जातींसाठी गांडुळ खतांचा वापर देखील फायदेशीर ठरत आहे.

पाणी व्यवस्थापन : टॅपिओका हे ८ ते १० महिन्यांत तयार होणारे पीक आहे. त्याकारणाने पिकाला पाणी पुरविणे अंत्यंत गरजेचे आहे. लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांच्या अंतराने सुरूवातीला पाणी द्यावे. पीक ३ महिन्यांचे होईपर्यंत ७ ते ८ दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर पीक काढणीपर्यंत १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे.

छाटणी : टॅपिओकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पिकाची छाटणी वेळेवर व तंत्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे. टॅपिओकाची छाटणीची पद्धत ही टॅपिओकाच्या जातीवर अवलंबून राहते. टॅपिओकाच्या लागवडीनंतर खोडावर एकाच वेळेस अनेक फुटवे येतात, त्यापैकी एकासमोर एक असे दोनच फुटवे ठेवून बाकीचे फुटवे १५ दिवसांच्या आत काढून टाकावेत. त्या दोन फुटाव्यांवर पुन्हा १५ ते २० सें.मी. अंतरावर 'व्ही' (V) टाईप दोन - दोन उपफाटे वाढू द्यावेत. छाटणी करण्यासाठी धारदार सिकेटर्सचा उपयोग करावा व जमिनीकडे झुकलेल्या फांद्या, तसेच वाळलेल्या, वेड्यावाकड्या, रोगग्रस्त फांद्या छाटून टाकाव्यात. टॅपिओका झाडाला डेरेदार किंवा छत्रीचा आकार प्राप्त होईल अशा पद्धतीने छाटणी करावी.

रोग व कीड नियंत्रण :

रोग व किडींमुळे टॅपिओका पिकाचे फार नुकसान होते व हे नुकसान टाळण्यासाठी रोग व किडींवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण :

१) पानावरील तांबडे ठिपके : भरपूर पावसाच्या ठिकाणी व दलदल जमिनीत या रोगाचा परादुर्भाव जास्त होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानावर ठिपके पडून पाने पिवळी होतात व गळून पडतात.

या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी थ्राईवर ३० मिली, क्रॉंपशाईनर ३० मिली, हार्मोनी १५ मिली आणि बाविस्टीन १० ग्रॅम पावडर १० लिटर पाण्यातून फवारावी. नवीन सुधारित जातींचा वापर करावा.

२) कॅसावा मोझाईक : या रोगामुळे टॅपिओका पिकाचे फारच नुकसान होते. या रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाण्यांमुळे होतो. पानांवर पिवळ्या रंगाचे अनियमित डाग पडून पानांचा आकार कमी होतो. यामुळे पाने मुरडतात व विकृत आकार धारण करतात.

या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ३० मिली मिसळून फवारणी करवी.

३) मर किंवा कॅसावा बॅक्टीरियल ब्लाईट : या रोगाचा प्रसार बियाण्यांमार्फतच होतो. या रोगामुळे झाडांची जुनी पाने वाळतात व लटकून राहतात तसेच खोडाचा टोकाकडील भाग वाळतो व मरतो. मुळे कुजतात व काळी पडतात.

या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा. तसेच थ्राईवर, क्रॉंपशाईनरची वरून फवारणी करून जर्मिनेटर चे कॉपर ऑक्झीक्लोराईडसह ड्रेंचिंग करावे.

प्रमुख कीड व त्यांचे नियंत्रण :

१) कोळी : ही कीड अतिशय उपद्रवी आहे. या किडीचे तोंड सुईसारखे असल्यामुळे पिकाच्या वेगवेगळ्या भागातून त्या रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर काळी ठिपके पडून पाने गळून पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी २ ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे, तसेच सप्तामृतांसह प्रोटेक्टंट महिन्याच्या अंतराने फवारावे.

२) खवले कीड : टॅपिओका पिकाची काढणी केल्यानतंर या किडी खोडावर किंवा क्वचित प्रसंगी उभ्या पिकावर आढळून येतात. या किडीवर पांढरे खवले असतात. या किडी पिकाच्या विविध भागातून रस शोषून घेतात. या किडीचे नियंत्रण सरपटणार्‍या अवस्थेतच करावे.

३) वाळवी व हुमणी : वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. हुमणी ही कीड शेनाखताद्वारे कंपोस्टमधून शेतात पसरते व कोवळ्या मुळ्या खाते, त्यामुळे झाडे मरायला लागतात.

वाळवीच्या नियंत्रणासाठी वारूळे उकरून त्यातील मादी नष्ट करवी.

याशिवाय उंदीर / घुशीसुद्धा पिकाचे नुकसान करतात व त्यांच्या नियंत्रणासाठी फॉस्फईडच्या गोळ्या तसेच सापळे किंवा पिंजर्‍यांचा वापर करावा.

वरील रोग किडींवर प्रतिबंधक उपाय महणून तसेच कंदांचे पोषण होऊन स्टार्चचे प्रमाण वाढून गुणवत्ता वाढीसाठी खालीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात.१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १ महिन्यांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २ महिन्यांनी) : जर्मिनेटर ३०० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ३।। महिन्यांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (५ महिन्यांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २०० ते २५० लि. पाणी.

कंदाची काढणी व साठवण : टॅपिओका पिकाच्या लागवडीमध्ये कंदाची काढणी व बाजारात पाठविण्यपर्यंत त्यांची साठवण हे फार महत्त्वाचे आहे. कंदांची काढणी जातीनुसार म्हणजे कमी मुदतीच्या जातीची काढणी लावणीपासून १० महिन्यांनी करावी.

कंद जमिनीत वाढत असल्यामुळे काही लक्षणे विचारत घेऊन कंदाची काढणी करवी. ही लक्षणे पुढील प्रकारची आहेत. झाडाला फुलोरा येणे, पाने पिवळी पडणे, बुंध्यालगतची जमीन भेगाळणे इ.

कंद काढण्यापुर्वी पिकास पाणी द्यावे व वापस येताच खोडाच्या बुडाला धरून झाड कंदासह उपटावे व कंद वेगळे करावेत. कंद काढताना ते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंदाच्या काढणीपासून टिकाव, कुदळ वा सुधारित हार्वेस्टरचा उपयोग करावा.

कंदाची काढणी झाल्यानंतर त्याची साठवणदेखील फार महत्त्वाची आहे. कंद साठवणीच्या विविध पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

१) खड्डा पद्धत,

२) मेणाची आवरण पद्धत,

३) शीतगृह पद्धत,

४) रासायनिक उपचार पद्धत.

खड्डा पद्धतीमध्ये कंदाचा थर व मातीचा थर आलटून पालटून देऊन कंदाची रचना करतात. मेणाच्या आवरण पद्धतीत २.२% बुरशीनाशक मेन आणि १७ % ट्रायइथानोळ अमाईन व ५ ओफेनील - फेनॉल असलेल्या पाण्याच्या द्रावणात कंद एक मिनिट बुडवून नंतर सुकवून खोलीच्या तापमानात साठवितात. शीतगृह वापर पद्धतीत कंद शीतगृहात ३ डी. सें. तापमानात ४ आठवडे साठविल्यास कंदांचे नुकसान २३% होते. कंद ० ते २ डी. से. तापमानात १५ दिवस साठविता येतात. घरच्या रेफ्रिजरेटरमध्ये ७ डी.से. तापमानात ताजे कंद ५ दिवस साठवून ठेवता येतात. रासायनिक उपचार पद्धतीत कंदाचा उपयोग स्टार्च काढण्यासाठी १.२% फार्माल्डिहाईडच्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून हे कंद हवाबंद २५ दिवस ठेवता येतात. मात्र खाण्याच्या कंदावर असा उपचार करता येत नाही.

प्रक्रियायुक्त विविध पदार्थनिर्मिती : शेवरकंदांची खांदणी केल्यानंतर २४ ते ७२ तासात कंद कुजून प्रक्रिया निरुपयोगी होत असल्यामुळे त्यावर त्यापूर्वी प्रक्रिया करावी लागते आणि त्यापासून निरनिराळे पदार्थ घरगुती स्वरूपात, छोट्या सहकारी तत्त्वावर, मोठ्या औद्योगिक प्रकल्पाद्वारे अथवा कारखान उभारूसुद्धा करता येतात.

१) स्टार्च -१ : कंद जमिनीतून बाहेर काढल्यानंतर त्वरित स्वस्छ् पाण्याने धुवून घ्यावेत.

२) कांदांच्या दोन्ही निमुळत्या बाजू २ सें.मी. अंतर ठेवून मुख्य कंदापासून कापून घ्याव्यात. नंतर कंदावरील बाह्य साल व सालीलगतच भाग काढून टाकावा.

३) सोललेल्या कांदांचे तुकडे करून खवणीने ते किसून घेतात. नंतर खाली -वर करून एकत्रीत आणतात व त्यापासून लगदा तयार करतात.

४) लगद्यामधील तंतूमय पदार्थ वेगळे काढण्यासाठी लगदा गाळून घ्यावा लागतो. त्यामधून सत्वाचे (स्टार्चचे) दूध निघण्याकरिता भरपूर स्वच्छ पाण्याचा वापर करतात.

५) वेगळे केलेले दूध मोठ्या टाक्यांमध्ये सुमारे ६ तास संथपणे ठेवतात. या कालावधीत सत्व तळाशी बसते. भांड्यात असणारे वरील पाणी ओतून टाकावे.

६) तळाशी बसलेल्या सत्वाचा वरचा थर पिवळट हिरव्या रंगाचा असून त्यात अशुद्ध पदार्थ असतात. तो खरवडून राहिलेले सत्व पाणी मिसळून पुन्हा धुतात. ही शुद्धीकरणाची क्रिया पांढरे सत्व मिळेपर्यंत करतात.

७) शुद्ध झालेले हे सत्व मोठ्या टाक्यांत, परातीत किवा उथळ भांड्यात पसरवून उन्हात वाळवितात.

८) शेवटी सत्वाचे टणक गोळे दळून भुकटी तयर करतात आणि ती चाळून घेतात.

आहारदृष्ट्या शेवरकंदापासून तयार केलेल्या सत्वामध्ये विविध घटकांची टक्केवारी प्रमाणशीर असेल तर ते सत्व उत्तम प्रतिचे समजावे . या स्टार्चचा उपयोग अनेक उपपदार्थ निर्मितीसाठी निरनिराळ्या स्वरूपात करता येतो. शिवाय कॅसावा स्टार्चचा उपयोग कापड, अन्न, डेक्स्ट्रीन, ग्लुकोज व रसायन उद्योगात करतात.

२) साबुदाणा : साबुदाणा तयार करण्यासाठी अगोदर तयार केलेला ओला स्टार्च कापडी पिशव्यात हलवून किंवा यांत्रिक गॅन्युलेटरमध्ये टाकून गोळ्या तयार करतात.काहिलीच्या आतील भागाला खोबर्‍याचे तेल लावून गरम काहिलीत गोळ्या १५ मिनिटे ठेवतात.तेव्हा जिलेटिनाईज्ड गोळ्या बनतात.त्या सुमारे १.५ ते २ तास वाळवितात.

ओल्या स्टार्चपासून टॅपिओका पोहे सुद्धा बनवितात. त्यासाठी ओला स्टार्च ८ मेश / सें.मी. चाळणीवर घासतात. जे जाडेभरडे ओले पीठ खाली पडते ते लोखंडी काहिलीला आतून तेल लावून २ मिनिटे शिजवून हे पोहे सुमारे ५० डी. सें. तापमानावर वाळवितात.

याप्रमाणेच शेवरकंदापासून चिप्स, दळलेले पीठ, कृत्रिम तांदूळ, रस व पेये, इन्सटंट फूड तयार करतात. तवकील ज्याचा उपयोग कापड गिरण्यात खाळीकरिता करतात तसेच गुरांचे खाद्यसुद्धा शेवरकंदापासून तयार करता येतात.

आपल्या शेतात शेवरकंदाची लागवड व उत्पादनाची कामगिरी काही ठराविक राज्यांमध्येच दिसून येते. सध्या या पिकाची लागवड बहुउद्देशीय तत्वाने केली जात आहे. युरोप व इतर काही प्रगत राष्ट्रांकडून टॅपिओकचे स्टार्च, दळलेले पीठ व इतर विविध पदार्थांना भरपूर मागणी आहे. शेवरकंदाच्या उपयोगितेनुसार हे पीक दिवसेंदिवस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम होत चालले आहे.

Related Articles
more...