उन्हाळी भुईमूग ३ एकर मर रोग जाऊन उत्पादन २७ क्विंटक, नफा १ लाख ३ हजार

श्री. विजयराव नामदेवराव मेहरे,
मु.पो. ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती - ४४४९०४.
मो. ९६७३३१४८०३



आमच्याकडे एकूण १२ एकर जमीन आहे. त्यातील ३ एकरमध्ये भुईमुगाची लागवड केली आहे. भुईमुगाचे पीक काही अनुभव नसताना पहिल्यांदाच केले आहे. त्यामुळे एकरी बियाणे किती लागते याचाही अनुभव नव्हता. मग माहिती घेऊन दप्तरी टी. जे. २४ या वाणाची निवड करून ३ एकरसाठी ५ बॅगा बी आणले. या जमिनीत मागील पीक तूर व सोयाबीन असल्याने एकेरी व दुहेरी व्ही (V) पास रोटाव्हेटरने जमिनीची मशागत केली, त्यानंतर ८ बोटी काकरीच्या दात्याप्रमाणे सारे (काकऱ्या) पाडल्या. बियाणे बिजप्रक्रिया न करता बायांना डोबण्यास (टोकण्यास) सांगितले. सर्व शेत डोबून झाल्यावर तृषार सिंचनाच्या ४ तास शिपा चालू केल्या.

त्यानंतर जवळपास १० - १५ दिवसांत भुईमूग उगवून आल्याचे दिसून आले. त्यावेळी आमची भेट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी संतोष फरकाडे यांच्याशी झाली. त्यांनी आमचा प्लॉट पाहिला, तेव्हा जाणवले की, प्लॉटमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव खुप झाल्याने झाडे मरत आहेत. अगोदरच बियाणे कमी पडल्याने भुईमुगाचा प्लॉट विरळ दिसत होता. त्यामध्येच मर रोगाने झाडे मरत होती. मग प्रतिनिधींनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + न्युट्राटोन १ लि. + स्प्लेंडर ५०० मिली हे ३०० लि. पाण्यातून फवारले. त्यानंतर ३ दिवसांनी आम्हाला झाडांची मर कमी होऊन वाढ जोमाने सुरू झाली. त्यानंतर २० दिवसांनी डी.ए.पी. खताची एकरी १ बॅग याप्रमाणे ३ बॅगा फोकून दिल्या. त्यानंतर पाणी चालू केले. पाणी बंद केल्यानंतर ३ - ४ दिवसांनी भुईमुगाची पाने पिवळट पडू लागले व पाने खाणाऱ्या आळीने पानांची चाळणी होऊ लागल्याचे आढळून आले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + किटकनाशक याची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने ३ - ४ दिवसात आळी व पाने पिवळी पडणे याचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. प्लॉट टवटवीत दिसू लागला.

त्यानंतर प्लॉट ५० दिवसांचा असताना फुले लागण्यास सुरुवात झाली. फुलावर असताना आम्ही खताचा दुसरा डोस (सुक्ष्म अन्नद्रव्य) एकरी १ बॅग याप्रमाणे ३ बॅगा दिल्या. त्यानंतर पाणी चालू केले. तेथून १८ ते २२ दिवसांनी झाडांना काटे सुटण्यास (आऱ्या लागण्यास) सुरुवात झाली. मग ८ बोटी डवराने झाडांना मातीची भर दिली व तृषार सिंचन पद्धतीने पाणी सुरू केले. १ शिप २ घंटे (तास) चालू ठेवली. तेथून १५ - २० दिवसांनी आऱ्यांना शेंगा सुटण्यास सुरुवात झाली. त्यावर पुन्हा १ पाण्याची शिप फिरवली व ६ दिवसांनी तळण दिले. (पाण्याचा ताण दिला/ पाणी देणे बंद केले) तळण दिल्याने (पाणी देणे बंद केल्याने) लागलेल्या आऱ्या वर उघड्या न राहता पाण्याच्या शोधात जमिनीत घुसतात व त्याला शेंगा जादा लागतात. यासाठी तळण दिले जाते. नंतर तिसरी फवारणी थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. तळण दिल्यामुळे व वरील फवारणीमुळे मागे पकडलेल्या (लागलेल्या) शेंगा भरण्यास मदत झाली.

१० मे २०१६ पर्यंत आमच्या शेंगा तयार झाल्या. १५ मे २०१६ पासून भुईमूग उपटण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेंगा तोडून ५ ते ६ दिवस शेंगा वाळविल्या. शेंगा खळखळीत वाळल्यानंतर पोती भरून मार्केटला नेल्या. तेथे ५,१२५ रु./क्विंटल भाव मिळाला. ३ एकरातून पूर्ण वाळलेल्या शेंगांचे एकूण उत्पादन २७ क्विंटल मिळाले. यासाठी ३५ हजार रु. खर्च आला. निव्वळ नफा १ लाख ३ हजार रु. मिळाला.