थंडीत लावलेले ढेमसे (टिंडा) उन्हाळ्यात रोगाने पछाडले, वेळ अर्धे झाले अशाही परिस्थितीत उत्पादन, दर २५ ते ३० रु./किलो

श्री. सतिश अवधुतराव ढोडरे,
मु. देवळी, पो. काकडघाट, ता. हिंगणा, जि. नागपूर.
मो. ७३७८९०२९८०


ढेमसे जानेवारी २०१६ मध्ये २ एकर मध्यम प्रतिच्या जमिनीत लावले होते. अंकूर कंपनीचे ३ किलो बी ७०० रु. प्रमाणे घेतले होते. लागवड ३' x २' वर होती. या जमिनीत अगोदरचे पीक कपाशी होती. माझ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही आणि आमच्या गावात सर्व कष्टाळू शेतकरी आहेत, त्यामुळे गावातील शेती मक्त्याने (खंडाने/बटाईने) कोणी देत नाही. तेव्हा आमच्या तालुक्यातील बट्टीबोरी येथील शेती मी २ हजार रु./एकर अशी मक्त्याने केली आहे. तेथे पाण्याची सोय चांगली आहे. तर ह्या ढेमसे पिकावर उन्हाळ्यात करपा, डावणी रोगाचा प्रादुर्भाव अचानकच वाढला. यावर रासायनिक औषधे फवारली. त्याने काही प्रमाणात रोग कमी आला. मात्र पुर्ण रोग काही आटोक्यात येत नव्हता. त्यामुळे वेळ निस्तेज दिसत होते. वाढ खुंटली होती. त्यामुळे उत्पादनाची आशाच संपली होती. दरवर्षी उन्हाळ्यातील लागवडीचे वेल ४ - ५ फुटपर्यंत वाढतात, मात्र यावर्षी या रोगामुळे वेल ३ ते ३।। फुटापर्यंतच राहिले. दरम्यान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. रोशन घाडे भेटले त्यांनी मला थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली आणि हार्मोनी ३० मिली प्रति पंपास (१५ लि. पाणी) याप्रमाणे फवारण्यास सांगितले. त्यानुसार फवारणी केली असता ५ दिवसात रोग ७५ ते ८०% आटोक्यात येऊन नवीन फूट (शेंडा वाढ) दिसू लागली.

४५ ते ५० दिवसात मालाचे तोडे चालू झाले. तर सुरुवातीला आठवड्यातून ३ वेळा म्हणजे दिवसाड तोडे करत होतो. २ एकरातून तोड्याला १२ ते १५ कट्टे (६० ते ६५ किलोचे) ढेमसे माल मिळत होता. असे ७ - ८ तोडे झाल्यानंतर माल थोडा कमी होऊ लागल्यावर आठवड्यातून २ वेळा व पुढे आठवड्यातून एकदा मालाचे तोडे केले. असे एकूण १२ - १३ तोडे झाले. ४० किलोच्या १ मनला १००० ते १२०० रू. भाव नागपूर मार्केटला मिळाला. या अनुभवातून जुनमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ढेमस्याची पुन्हा लागवड करणार आहे.