रमजानसाठी पपईचा खोडवा

श्री. बेगाजी संभाजी गावडे, मु. पो. डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.


तैवान ७८६ पपई ९' x ५' व १०' x ५' अशी दोन वेगवेगळ्या अंतरावर आम्ही आपल्या तंत्रज्ञानाने लावली. जमीन मध्यम काळी आहे. रोपे तयार करण्यापासून पुनर्लागवडीपर्यंत कल्पतरू सेंद्रिय खत, जर्मिनेटर व सप्तामृत औषध वापरून वरीलप्रमाणे लागवड केली. दोन वेळा कल्पतरू दिले व तीन वेळा सप्तामृत फावाणीपत्रकामध्ये दिल्याप्रमाणे फवारणी केली. कोणताही रोग नाही. रासायनिक खताचा वापर फारच कमी केला. पाऊस आमचे जिल्ह्यात भरपूर पडतो. गेल्यावर्षी वरच्या शेतकर्‍याने शेतातले पाणी आमचे शेतात सोडले, पण खालचा शेतवाला पाणी येऊ देईना. तेव्हा बागेत जास्त काळ पाणी साठल्याने मालावर परिणाम झाला. पाने पिवळी पडली व गळाली. या वर्षी मात्र पाणी जाण्याकरता दोन्ही बाजूने २ चर काढल्याने फायदा झाला. तसेच सप्तामृत व कल्पतरू वापरल्याने प्रत्येक झाडापासून १०० ते १५० पपई मिळाली. २५% माल सुपर असायचा. हा माल फक्त दिल्ली मार्केटला चालायचा ५ रू. किलोने दिल्लीचे दलाल जागेवरून माल खरेदी करून २ व ३ नंबरचा माल इंदोर, भोपाळ, कोटा येथे चालत असे २ - ३ रू. किलोच्या आसपास भाव मिळायचा.

पण दिल्लीच्या दलालांनी सुपर माल तोडला की, २ - ३ नंबरचा माल इंदोर, भोपाळवाले घेत नसत. नंतर नंतर दिल्लीचे दलाल भाव वाढवून देऊ लागले, पण २ व ३ नंबर पट्टीचा माल पडून राहायला लागला. म्हणून आम्ही त्यांना त्यांचे हाताने माल तोडायचे बंद केले व आम्ही दिल्ली मार्केट न करता इंदोर, कोटा,भोपाळ करू लागलो तेथे सरसकट ४॥ रू. किलो भाव मिळाल्याने अधिक परवडले.

परत याच पपईच्या झाडांवर माल धरला आहे. हा माल येणार्‍या रमजानच्या महिन्यात चालू होईल आणि भाव मिळाल्याने पैसे होतील. झाडांना दोन्ही बाजूने फाटे फुटले आहेत व प्रत्येक फांद्यावर १० -१२ पपई व मुख्य फांदीवरही २० पपई अशी प्रत्येक झाडावर ५० - ६० पपई लागलेली आहे.

काढणी: झाडांची उंची २० पर्यंत गेली आहे. बांबूची शिडी करून घेतली आहे. ही शिडी सरळ पपईच्या झाडांना उभी लावतो. पपई काढणार्‍या मजुरांना हातमोजे दिले आहेत. ते डाव्या हाताने शिडी लावलेल्या झाडास धरून उजव्या हाताने पपई काढली जाते. त्यानंतर पपई पोत्यावर ओतून त्याला रद्दी लावली जाते. अशी पपई मार्केटला नेण्यासाठी तयार झाली. शिडीवर चढून माल तोडणारी मुले वयाने लहान नेमावी लागतात म्हणजे झाडाचे नुकसान होत नाही.

मोजे जर न घालता मजुरांनी पपई काढली तर त्या चिकामुळे हातांना. बोटांना गव्हाचे आकाराची जखम होते. त्यामुळे मजूर पपई काढायचे टाळतात. मात्र डाल्याने पपई वाहणारी माणसेही मोजे वापरायला लागले की, पपईचे मोजे लवकर खराब होतात.

गेल्या रमजानच्या वेळेस बराच माल आम्ही मालेगांवला पाठवला, यावर्षी ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून यंदाच्या रमजानला पपई मार्केटला पाठवणार आहोत. दहा एकरात या भावामुळे या विज्ञानाने बारा लाख रुपये सहज होतात असा आमचा अनुभव आहे. भाव अधिक मिळाला तर निश्चितच जास्त पैसे होतील, पण हे सर्व मार्केटवर अवलंबून आहे.