कांदा, लसणाने वांधा करायचा नसेल तर…

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


मोसमी पावसाने जुलै अखेरीस उशीरा सुरुवात केल्याने एन - ५३ किंवा हळवा कांद्याखालील महाराष्ट्र व इतर राज्यांतील क्षेत्र हे जवळजवळ नगण्य झाले. हा कांदा जेव्हा ऑगस्टमध्ये मार्केटमध्ये येतो तेव्हा पारंपारिकतेने किंवा मार्केटचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, हा कांदा सर्वसामान्य माणसाला ५ ते ८ रू. किलो दराने उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना हा कांदा काढल्यानंतर लगेच ताजा ओला कांदा विकल्याने ४ ते ५ रू. किलो भाव मिळूनही परवडतो. कारण हा लवकर खराब होणारा असतो, त्याला गुलाबी एकच पत्ती असते. तथापि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर जर वेळापत्रकानुसार केला तर, ज्या हळव्या कांद्याला १ पत्ती असते. त्याला अनेक पत्ती येऊन तो कांदा गरव्या कांद्यासारखा दिसतो आणि त्याला दलाल गरव्या कांद्याचा भाव देतो, असे हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. ज्यावेळेस हळवा कांदा मार्केटला येतो तो १।। ते २ महिने चालतो आणि साठवणीतला कांदा १० ऑक्टोबरनंतर मार्केटमध्ये येतो. ज्या शेतकऱ्यांनी या गरव्या कांद्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला त्यांच्या कांद्याला २ - ३ पत्ती येऊन साठवणुकीत काजळी येणे, सडणे, कोंब येणे असे नुकसान क्वचीतच (२ - ५ %) होते. त्यामुळे शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होतो.

चालूवर्षी मात्र हळवा कांदा नसल्याने साठवणुकीतील कांदा शेतकरी सुरूवातीपासूनच मार्केटमध्ये आणु लागले, त्यामुळे १५ ते २० रू. किलोने बराच काळ (जून - ऑगस्ट) विक्री होऊ लागली. परंतु नंतर दिवाळीपर्यंत प्रचंड पावसाने लागवड केलेला गरवा कांदा जमिनीतच सडला, त्यामुळे जेथे एकरी २०० पिशवी उत्पादन अपेक्षित असते तेथे ३० - ४० पिशवीच निघाली. गरव्याला सुरुवातीस १५ ते २० रू. भाव मिळाला. परंतु जसजशी पुढे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढत गेली, तसा कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. नाशिकला ६० रू. चाकण - नारायणगाव मार्केटला ४० रू. तर किरकोळ ७० रू. किलो म्हणजे सफरचंदापेक्षा अधिक भाव झाले. त्यामुळे सामान्य लोक जेथे १ किलो कांद्याची गरज आहे तेथे पावशेर फांद्यावरच गरज भागवू लागले, हॉटेलमधून कांदा गायब झाला. ज्यांना जेवणात कांदा पाहिजे त्यांना जादा पैसे द्यावे लागतील असे ऐलान केले जाऊ लागले. कांदाभज्याची जागा कोबी भज्याने घेतली.

एकंदरीत गेल्या महिन्यात जो भावाने उच्चांक गाठला तो 'ना भुतो ना भविष्यती' एवढा होता. यात दलालांचे उखळ पांढरे झाले आणि शेतकऱ्यांना मात्र मर्यादितच पैसे मिळाले.

ज्यावेळेस कांदा उच्चांकीचा भाव गाठतो, त्यावेळेस सर्वसामान्यांच्या डोळ्यात तर पाणी आणतोच, परंतु देशातील राज्य सरकारे व केंद्र सरकार यांच्या पायाखालची वाळू सरकू लागते आणि पत्त्यासारखी सरकारे धडाधड कोसळतात. नेत्यांची, प्रशासनाची झोप उडते.

खरेतर हळवा कांदा जेव्हा मार्केटला आला नाही, तेव्हाच कांदा वांधा करेल असे सरकारच्या लक्षात यायला हवे होते. त्यातच अवकाळी पावसाने दिवाळीत कांदा पीक शेतातच सडले. तेव्हाच कांदा आयातीची व्यवस्था करून देशांतर्गत कांद्याचे भाव हे आटोक्यात आणता आले असते, परंतु सरकार कांद्याने सत्तरी गाठल्यावर जागे झाले. त्यामुळे देशभर कांद्याने साऱ्यांना रडवले. पाकिस्तानातील किंवा इराणचा कांदा आयात केल्याने तो कांदा देशांतर्गत दर वाढल्याने जादा भावाने आयात करावा लागेल आणि हा कांदा भारतीय लोकांच्या चवीस उतरत नाही. कारण हा कांदा दुय्यम दर्जाचा असून लवकर सडतो. त्यामुळे लोक याचा स्विकार करत नाहीत.

कांदा हा जीवनावश्यक वस्तु म्हणून जाहीर करून देशातील रेशनिंग दुकानातून व दुधडेअरी व तत्सम समाज उपयोगी स्टोअर्समधून अगोदरपासूनच उपलब्ध करून देणे हे शहाणपणाचे ठरेल. भाव अवाक्याच्या बाहेर गेल्यावर अशा उपाययोजना केल्यावर बुडत्याला काठीचा आधार देऊन बेगडी मलमपट्टी केली जाते.

गेल्या महिन्यात लसणाचा लेख लिहीताना लसणाचे दर वाढतील हे लिहीले होते. तेच आज २०० रू. पासून ३०० रू. किलो भाव झाले आहेत.

लसणाचे आयुर्वेदातील महत्त्व लक्षात घेता लसणाला आयुर्वेदातील 'बदाम' संबोधले जाते. मागणी व पुरवठ्यातील दरी वाढल्याने हे भाव ५०० रू. किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा लसणाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे लसणाचा कांदा होऊ नये व कांद्याचा लसूण होऊ नये. याचा अर्थ लसणाचे भाव कांद्याच्या भावाच्या चौपट ते पाचपट असतात. असे कांदा लसणाच्या भावाचे सुत्र आहे.

चीनचा लसूण व पाकिस्तान, इराणचा कांदा आयात करून आणि देशांतर्गत गरज भागविण्यासाठी निर्यात थांबवून भाव नियंत्रणात आणणे, हा फारसा दुरदृष्टीचा निर्णय नव्हे हे संबंधी तांनी लक्षात घ्यावे.

जेव्हा कोथिंबीर आणि मेथीचे भाव गगनाला भिडतात तेव्हा सुज्ञ गृहीणी कोथिंबीर आणि मेथी जेव्हा स्वस्त असते तेव्हा ती निवडून वाळवून डबे बंद साठवून ठेवतात आणि जेव्हा भाव वाढतात तेव्हा ती बाहेर काढतात. त्याप्रमाणे याच सुत्राचा वापर करून कांदा भाव वाढीची चाहुल मोसमी पावसाच्या प्रमाणावर लागल्यावर स्वस्तात मिळणाऱ्या कांद्याच्या उभ्या फोडी कापून व्यवस्थीत वाळवून साठवून ठेवल्यास सर्वसामान्य माणसांना कांद्याची अकाली भाव वाढ भेडसावणार / सतावणार नाही. कांद्याची निर्यात व आयात ही फार दुरदृष्टीने करावी लागते. तहान लागल्यावर विहीर खोदुर कधीच जमत नसते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर करावयाची उपाययोजना म्हणजे साप गेल्यावर भुई धोपटण्यासारखे आहे. प्रशासन व नेते यांनी चाणाक्ष बुद्धीने नियोजन केले तर कांदा वांधा करणार नाही. सरकारे कोसळणार नाहीत व सर्वसामान्यांच्या डोळ्यातून कांदा अश्रु काढणार नाही आणि याच्या तिखटशा चवीनेसुद्धा कांदा सर्वसामान्यांमध्ये गोडी निर्माण करेल.